- अनंत जाधव
सावंतवाडी : पोलीस खाते म्हटले की शिस्त आली; पण शिस्तीच्या खात्यातही एखादा संवेदनशील पोलीस अधिकारी असू शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम. आपला पोलीस कर्मचारी मतदानाच्या आधल्या दिवशी गावात गेल्यानंतर त्याला लागणारी टूथपेस्ट, ब्रश, साबण यापासून सर्व काळजी गेडाम यांनी घेत त्यांच्यासोबत एक किटच तयार करून दिले आहे. आपला कर्मचारी मतदानादिवशी फ्रेश राहील, त्याला प्रत्येक वस्तूसाठी कुणाकडे हात पसरावे लागणार नाहीत, हा यामागचा हेतू आहे.
रविवारी हे किट पोलीस कर्मचा-यांच्या हातात पडताच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. राज्यात हा पहिलाच प्रयोग सिंधुदुर्गमध्ये करण्यात आला असून, याचा लाभ सिंधुदुर्ग तसेच बाहेरच्या २२०० पोलीस कर्मचा-यांना झाला आहे. वरिष्ठांचे आदेश, शिस्त, कुठेही काही घडले की डोळ््यात तेल घालून बंदोबस्त आणि निवडणुका असल्या तर बंदोबस्त अधिकचा असतो. नेत्यांच्या सभांमुळे या काळात गावागावात बंदोबस्तावर जोर द्यावा लागतो. हे करूनही मतदानाच्या आदल्या दिवशी गावात जाणे हे सर्वात महत्त्वाचे असते. आतापर्यंत पोलिसांना ड्युटी दिली की ते गावात जात. पण ते त्या रात्री कुठे राहणार, सकाळी उठल्यावर त्यांना साबण व टूथपेस्ट मिळेल का? याचा कोणी विचारही करत नाही.
मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे घडले आहे. राज्यात प्रथमच सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांना एक संकल्पना सूचली आणि ती त्यांनी सत्यातही उतरवली. यावर ते गेला महिनाभर काम करत होते. निवडणुकीसाठी जिल्ह्यात तब्बल २२०० पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. यात बाहेरून आलेल्याही पोलिसांचा समावेश आहे. राज्य राखीव दल, जलद कृती दल अशा पोलिसांच्या तुकड्यांचा समावेश आहे. या पोलीस कर्मचा-यांना पोलीस अधीक्षक गेडाम यांनी रविवारी पोलीस मुख्यालयात सुखद धक्काच दिला आहे.
हे पोलिस कर्मचारी बुथच्या सुरक्षेसाठी गावागावात जाणार आहेत. तेथे त्यांनी चांगल्या वातावरणात बंदोबस्त केला पाहिजे, यासाठी या पोलिसांच्या हाती एक किट ठेवले आहे. या किटमध्ये टूथब्रश, त्यासाठी लागणारी छोटी कोलगेट, साबण, बिस्किट, चॉकलेट यासह हेअर आईल आदीचा समावेश आहे. तर मतदानादिवशी त्यांना दोन पाणी बॉटल, उन्हात अशक्तपणा येऊ नये यासाठी एनर्जी बार आदी वस्तू या किटमध्ये आहेत. शिस्तीच्या खात्यातही एखादा संवेदनशील अधिकारी असू शकतो, हेच यातून दिसून आले.
हे सर्व किट घेतल्यानंतर पोलीस कर्मचारी बुथ सुरक्षेसाठी गावागावात रवाना झाले. पण त्यांनी आमची काळजी करणारा कोण तरी आमच्यामागे आहे, हे यातून दाखवून दिले. सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांची ही संकल्पना आता राज्यातील अनेक जिल्ह्यातील अधिकारी घेतील आणि घेतलीही असेल, मात्र हे कोणाच्या लक्षात येते? ज्याच्यात खाकीच्या आतमध्ये भावना दडल्या आहेत, त्याच्या हे लक्षात येत असते.
याबाबत सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांना विचारले असता त्यांनी राज्यात प्रथमच सिंधुदुर्ग जिल्हा अशा प्रकारे हे किटचे वाटप करत आहे. आम्ही गेला महिनाभर यावर काम करत असून, या सर्व वस्तू सिंधुदुर्गमध्ये मिळाल्या नाहीत. आम्हाला कोल्हापूर येथून या वस्तू आणाव्या लागल्या. आमचे पोलीस कर्मचारी खूष झाले. ते चांगल्या प्रकारे बंदोबस्त करू शकतात, हेच आम्हाला यातून दाखवून द्यायचे आहे. हे किट सिंधुदुर्गातीलच नाही, तर सिंधुदुर्गमध्ये बंदोबस्तासाठी आलेल्या सर्व अशा २२०० कर्मचा-यांना देण्यात आले आहे.