कणकवली : लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा करताना काँग्रेसचे प्रांतिक सदस्य नीतेश राणे यांनी अलीकडेच पदाधिकाऱ्यांबाबत कठोर जाहीर वक्तव्य केले होते. यावरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस नेते तसेच पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.लोकसभा निवडणुकीत नीलेश राणे यांचा झालेला पराभव हा मोदी लाटेमुळे झालेला नसून काँग्रेसचे अनेक नेते व पदाधिकारी ठेकेदार झाले असून त्यांच्या कामाच्या पद्धतीबाबत जनतेने नाराजी व्यक्त केल्यानेच झाला होता, अशी भूमिका नीतेश राणे यांनी कणकवलीतील पत्रकार परिषदेत मांडली होती. या भूमिकेचे समर्थन कणकवली, कुडाळ तसेच अन्य तालुक्यांतील काही कार्यकर्त्यांनी करत फटाक्यांची आतषबाजी केली होती, तर माजी आमदार राजन तेली, काका कुडाळकर, संजय पडते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपाला प्रत्युत्तर दिले होते. यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये अंतर्गत कलगीतुरा रंगला आहे. ‘नाराज’ पक्षांतराच्या पवित्र्यात नीतेश राणे यांच्या वक्तव्यामुळे अनेक पदाधिकारी नाराज झाले असून, ते पक्षांतर करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नीतेश राणे यांनी मांडलेल्या कठोर भूमिकेबाबत खुद्द नारायण राणे यांनी तेलींसारख्या माजी आमदाराला फटकारल्यामुळे खळबळ माजली आहे. (वार्ताहर)
सिंधुदुर्ग काँग्रेसमध्ये फुटीची शक्यता
By admin | Published: July 03, 2014 11:51 PM