ओटवणे : सावंतवाडीच्या राजेशाही संस्थानाचा वारसा लाभलेल्या ओटवणे येथील प्रसिद्ध दसरोत्सवाची सावंतवाडी संस्थानचे मूळ राजे खेमसावंत भोसले यांच्या समाधीस्थळाच्या भेटीनंतर सांगता करण्यात आली. या उत्सवानिमित्त ओटवणे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. ओटवणे येथील दसरोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी, भक्तीमय वातावरणात साजरा झाला. खंडेनवमी दिवशी शिवलग्न सोहळा पार पडला, तर दशमी दिवशी नवस फेडणे, नवस करणे व त्यानंतर पारंपरिक धार्मिक विधी, सोने लुबाडणे असे विविध कार्यक्रम झाले. ओटवणे दसरोत्स्वातील प्रमुख आकर्षण ‘इंगळे स्नान’ या कार्यक्रमाला भाविकांनी गर्दी केली होती. ओटवणे दसरोत्सव सोहळ्याला माजी आमदार दीपक केसरकर, चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, राजन तेली, शिवराम दळवी, सोनू दळवी आदी मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली. या विजयादशमी सोहळ्यास ओटवणे दशक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी) श्री देवी पावणाई, देवी कायकायी आणि श्री देव कुळाचा पूर्वस या तरंगांचे सुवर्णालंकारांनी सजविलेले मुखवटे व त्यावर भरजरी वस्त्राचा साज पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. खंडेनवमी आणि विजयादशमी या दोन दिवसांच्या कालावधीत ओटवणेत दसरोत्सव साजरा झाला.
दसरोत्सवाची सांगता
By admin | Published: October 04, 2014 11:25 PM