सातारा : येथील रविवार पेठेतील नीलेश ढाले (वय २६) या युवकाचा खून केल्याचा आरोप असलेल्या संदीप मोझरसह सातजणांची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी मुक्तता केली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. पी. रघुवंशी यांनी हा निकाल दिला. मंगळवारी नीलेश ढाले खून खटल्याचा निकाल जाहीर होणार असल्याने मोझर समर्थकांनी न्यायालयात प्रचंड गर्दी केली होती. या खटल्यातील संशयितांना ११ वाजून ५० मिनीटांनी न्यायालयात आणण्यात आले. न्यायालयातील आरोपींच्या कक्षात त्यांना बसविण्यात आले होते. न्यायाधीश त्यांच्या खोलीमध्ये निकालाचे डिक्टेक्शन करत होते. तब्बल एक तास सर्वजण न्यायाधीशांची वाट पाहात होते. निकाल एकण्यासाठी सर्वजण आतूर झाले होते. संदीप मोझर यांच्या वडिलांसह स्वराज्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी न्यायालय खचाखच भरले होते. १२ वाजून ५० मिनिटांनी न्यायाधीश आसनस्थ झाले. तेव्हा न्यायालयात निरव शांतता पसरली. न्यायाधीशांनी सुरूवातीला सर्व आरोपींना पुढे बोलावून घेतले. प्रत्येकाची त्यांनी नावे वाचली. त्यानंतर काही क्षणातच त्यांनी या खटल्यातील सर्वजण निर्दोष आहेत, (आॅल अॅक्विटेड) असे सांगितले. त्यावेळी संशयितांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. मोझर यांच्या समर्थकांच्या आनंदाला पारावर उरला नाही. न्यायालयातून बाहेर येत असताना मोझर यांच्या कडेने युवकांनी प्रचंड गर्दी केली. अशा गर्दीतच पोलिसांनी मोझर यांच्यासह सातजणांना न्यायालयाबाहेर आणले. रस्त्यावर फटाक्याची आतषबाजी झाली. निकालाची प्रत कारागृहात पोहोचल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता मोझर व इतरांची कारागृहातून सुटका केली. तुम्ही लढाई जिंकली, मी आता युध्द् जिंकेन असे मोझर यांनी सुटका झाल्यानंतर प्रसिध्दीमाध्यमांशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
संदीप मोझरसह सातजण निर्दोष
By admin | Published: July 08, 2014 10:44 PM