वैभववाडी: पिसाळलेल्या कुत्र्यानं सकाळी वैभववाडी शहरासह एडगाव आणि सोनाळीत अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या श्वानाने दोन बालकांसह तब्बल सात जणांवर हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले आहे. यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पिसाळलेल्या श्वानाच्या दहशतीमुळे वैभववाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.सोनाळी येथील क्रिश मंगेश शिंदे(वय ५ वर्षं) या बालकाचा रविवारी सायंकाळी कुत्र्यानं चावा घेतला. त्यानंतर सोमवारी सकाळी वैभववाडी शहरासह एडगाव इनामदारवाडी हल्ला चढवून धुमाकूळ घालत दहशत माजवली. शहरातील गोपाळनगर येथील श्रावणी उदय गजोबार(वय 7 वर्षे) या चिमुकलीला लक्ष बनविले. घराबाहेर खेळत असलेल्या श्रावणीच्या कानाचा श्वानाने लचका तोडला. तसेच सुशीला दादू गजोबार(वय७०) व संजय निकम (वय३३) यांना गंभीर जखमी केले.तेथून त्याने पोलीस वसाहतीतील विजया शिरवलकर(वय 48) यांना लक्ष करीत हल्ला केला. त्यांना जमिनीवर पाडून चेह-यावर चावा घेत ओरबाडून गंभीररीत्या जखमी केले. त्यामध्ये सुदैवानेच त्यांचे डोळे बचावले आहेत. तसेच दीपक चंदू सूर्यवंशी(वय ३७) यांच्यावर हल्ला केला. तेथून श्वानाने एडगाव इनामदारवाडीकडे मोर्चा वळवला. तेथील कृष्णाजी देसाई(वय ६१) यांना चावा घेऊन जखमी केले. या जखमींवर ग्रामीण रुग्णालयात डाॅ. धर्मे यांनी उपचार करून जिल्हा रुग्णालयात पाठविले आहे. जखमींपैकी श्रावणी गजोबार व विजया शिरवलकर यांची प्रकृती अधिक गंभीर आहे.दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत आमदार नितेश राणे यांच्या सूचनेनुसार नगराध्यक्ष संजय चव्हाण, उपनगराध्यक्षा संपदा राणे व नगरसेवकांच्या उपस्थितीत नगरपंचायतीने दुपारी श्वान पकडण्यासाठी मोहीम राबविण्यास सुरुवात केली. परंतु श्वान पकडण्यासाठी देवगडहून दाखल झालेले पथक किती दिवस थांबणार हा खरा प्रश्न आहे.
वैभववाडीत पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात सात जण गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 5:15 PM