मालवण : प्रशासन, पदाधिकारी आणि नगरसेवकांनी शहरातील व्हाळ्यांची आणि गटारांची भरपावसात पाहणी केली. यात अनेक ठिकाणी व्हाळ्यांची खोदाई अर्धवटच झाल्याचे दिसून आले. नगरसेवकांच्या आक्रमक बाण्यामुळे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी गटार खोदाईची भरपावसात पाहणी करत वस्तुस्थिती जाणून घेतली. यावेळी अनेक नागरिकांनी अर्धवट गटार खोदाईबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.पावसाळा सुरू होऊनही मालवण शहरातील गटार खोदाई अपूर्ण असल्याने मालवणचे नगर उपनगराध्यक्ष राजन वराडकर, गटनेते गणेश कुशे, अप्पा लुडबे, पंकज सादये, ममता वराडकर, पूजा सरकारे यांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन थेट पाहणीची मागणी केली होती. त्यावरून शाब्दिक चकमक उडून वाद झाला होता. सायंकाळी ५ वाजता पाहणी करण्याचे या वादळी चर्चेत निश्चित केले गेले.
या पाहणीत नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मुख्याधिकारी संतोष जिरगे, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, नगरसेवक सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, मंदार केणी, यतीन खोत, गणेश कुशे, पंकज सादये, आरोग्य सभापती दर्शना कासवकर, तृप्ती मयेकर, ममता वराडकर, आकांक्षा शीरपुटे, सुनीता जाधव, भाई कासवकर, तपस्वी मयेकर, सन्मेश परब आदी तसेच अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.दांडी येथील व्हाळीची खोदाई अर्धवट ठेवल्याने माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत थेट मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला.गटार खोदाईबाबत नागरिकांची नाराजीयावेळी गवंडी वाडा, मकरे बाग, वायरी मोरेश्वरवाडी, बाजारपेठ मच्छीमार्केट परिसर, मेढा काळबादेवी मंदिरानजीकची पालवव्हाळी, चिवला बीच आदी ठिकाणी पाहणी करण्यात आली. पाहणीत प्रत्यक्षात अनेक व्हाळ्यांमध्ये अर्धवटच काम झाल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी व्हाळ्यांची खोदाईच झाली नसल्याचे दिसले. जेथे खोदाई केली होती, ते व्हाळीला लागूनच माती व कचरा टाकण्यात आल्याने पावसाच्या पाण्यामुळे तो कचरा पुन्हा व्हाळीत पडला होता. मुख्याधिकारी जिरगे यांनी सर्व ठिकाणी भरपावसात उतरून पाहणी केली. अनेक ठिकाणी नागरिकांनी गटार खोदाईबाबत नाराजी व्यक्त केली.