कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण पिढीमध्ये देशसेवेची ओढ़ निर्माण व्हावी तसेच शहीद जवानांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या रक्षा कलश दर्शन व मानवंदना यात्रेचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे, अशी माहिती शहीद मेजर कौस्तुभ राणे अभिवादन समितीच्यावतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.येथील शासकीय विश्रामगृहात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेच्यावेळी मानवंदना यात्रेच्या संयोजिका सुलेखा राणे, विनायक मेस्त्री, दिलीप रावराणे, शाम सावंत, एस.टी.सावंत, निवृत्त सुभेदार अशोक कदम, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी अर्जुन राणे, प्रभाकर सावंत, अवधूत मालणकर, प्रताप भोसले, संदीप सावंत, अनूप वारंग, विनायक सापळे आदी उपस्थित होते.यावेळी सुलेखा राणे म्हणाल्या, निसर्गसंपन्न सिंधुदुर्ग जिल्हा हा कलावंतांचा, समाजसेवकांचा, राजकारण्यांचा अशा ओळखी बरोबरच या जिल्ह्याला देश सेवेचा मोठा वारसा आहे. या जिल्ह्यातील अनेकांनी भारतीय लष्करात भरती होऊन विविध पदावर काम करताना देशसेवा केली आहे.
प्रसंगी देशासाठी हौतात्म्य पत्करून प्राणांची बाजी लावून देशरक्षणाचे काम करताना या जिल्ह्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या जिल्ह्यातील काही गाव सैनिकांचे म्हणून प्रसिध्द आहेत. हा समर्थ वारसा पुन्हा एकदा शहीद मेजर कौस्तुभ राणे यांनी अधोरेखित केला आहे.आठ ऑगस्ट रोजी आतंकवादी हल्ल्यात वैभववाडी तालुक्यातील सडुरेचे सुपुत्र असलेले मेजर कौस्तुभ राणे यांना शत्रुशी लढताना विरमरण प्राप्त झाले. त्यांचा हा वारसा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी ठरुन त्यांच्यात देशसेवेची ओढ़ निर्माण होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शहीद जवानांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या रक्षा कलश दर्शन व मानवंदना यात्रेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजन करण्यात आले आहे.21 ऑगस्ट रोजी मेजर कौस्तुभ राणे यांच्या मूळ गावापासून या मानवंदना यात्रेला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर वैभववाडी, लोरे, फोंडा असे मार्गक्रमण करीत ही यात्रा कणकवलीत सकाळी 8.30 वाजता पोहचेल. कणकवलीतील पू. अप्पासाहेब पटवर्धन चौकातुन बाजारपेठ मार्गे तेलीआळीतून ही यात्रा कणकवली महावि
द्यालयात पोहोचेल. त्याठिकाणी नागरिकांना दर्शनासाठी रक्षा कलश ठेवण्यात येणार आहे. तिथुन ही यात्रा कसाल, कुडाळ ,सावंतवाड़ी, वेंगुर्ले, मालवण, आचरा मार्गे सायंकाळी 6 वाजता कुणकेश्वर येथे पोहचेल. त्यानंतर रक्षा कलशाचे विसर्जन करण्यात येईल.कणकवली येथे जिल्हा पोलिस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात येईल. या यात्रेत विविध ठिकाणी पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार नीतेश राणे, आमदार वैभव नाईक तसेच इतर राजकीय व प्रतिष्ठित व्यक्ति सहभागी होणार आहेत.
या यात्रा आयोजन व नियोजनासाठी प्रशासकीय यंत्रणा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार्य करणार आहे. या यात्रेत जिल्ह्यातील नागरिकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.शाश्वत कार्याची गरज !शहीदाना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहन्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाश्वत कार्याची गरज आहे. ओरोस सारख्या जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्ह्यातील तरुणांना मार्गदर्शन करून लष्करात अधिकारी पदावर कार्यरत करणे.
देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबाना पुढील काळात मदत होऊ शकेल असे एखादे केंद्र स्थापन करणे आवश्यक असून त्यासाठी जिल्हा वासियानी आता पुढे येणे आवश्यक आहे. या मानवंदना यात्रेच्या निमित्ताने तसा संकल्प करून कामाला लागणे ही काळाची गरज आहे, असे विनायक मेस्त्री यानी यावेळी सांगितले.