बांदा : गाळेल-भोमवाडी येथील सुभाष राजाराम परब यांच्या शेतमांगरातील काजू बियांना लागलेल्या भीषण आगीत १0 टन काजू जळून भस्मसात झाल्याने सुमारे दहा लाख रुपयांचे तर मांगराचे चार लाख असे एकूण चौदा लाख रुपयांचे नुकसान झाले. सुभाष परब यांची गाळेल येथे मोठी काजू बागायती आहे. याच ठिकाणी बांधलेला शेतमांगर आहे.वर्षभरातील हंगामात गोळा केलेली काजू बी सुभाष परब आपल्या शेतमांगरात साठवून ठेवतात. दिवाळी पाडव्यानंतर ते काजू बी बाजारात विक्रीसाठी नेतात. यावर्षीही परब यांनी काजू बी शेतमांगरात साठवून ठेवली होती. बुधवारी लक्ष्मी पूजनानंतर परब आपल्या घरी गेले होते. गुरुवारी सकाळी परब यांचे कामगार याठिकाणी आले असता त्यांना शेतमांगराला आग लागलेली दिसून आली. मात्र, आग मध्यरात्री लागल्याने शेतमांगरातील काजू बी जळून खाक झाले. मांगराचेही मोठे नुकसान झाले. सकाळपर्यंत आग धगधगतच होती. याची माहिती कामगारांनी स्थानिकांना देताच सकाळी आग विझविण्यात आली. याठिकाणी जवळपास वस्ती नसल्याने आग लागल्याचे निदर्शनास आले नाही. मांगरातील १0 टन काजू जळाल्याने सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. शेतमांगराचे व इतर वस्तूंचे सुमारे चार लाख रुपयांंचे नुकसान झाले. आग शॉर्टसर्किटने लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.घटनेची माहिती मिळताच बांदा सरपंच मंदार कल्याणकर, उपसरपंच बाळा आकेरकर, डिंगणे सरपंच स्मिता नाईक, काँग्रेसचे माजी उपतालुकाध्यक्ष गुरुनाथ सावंत, शहर अध्यक्ष जावेद खतीब, बांदा पोलीस उपनिरीक्षक सुधाकर आरोलकर, तलाठी एन. एस. मयेकर, प्रदीप सावंत, विलास सावंत यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व पंचनामा केला. (प्रतिनिधी)
शेतमांगराला आग लागून १४ लाखांचे नुकसान
By admin | Published: November 13, 2015 11:23 PM