शरद पवारांना प्रचारासाठी नेताना वय दिसले नाही का?, जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 03:54 PM2023-07-12T15:54:28+5:302023-07-12T15:55:33+5:30
कुडाळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे कॅन्सरचे ऑपरेशन झाले, त्यांच्या तोंडातून रक्त, लाळ पडायची, पायाचे ऑपरेशन ...
कुडाळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे कॅन्सरचे ऑपरेशन झाले, त्यांच्या तोंडातून रक्त, लाळ पडायची, पायाचे ऑपरेशन झाले असतानाही केवळ निवडणुकीत स्वत:च्या विजयासाठी मतदार संघात प्रचारासाठी नेणाऱ्यांना तेव्हा त्यांचे वय दिसले नव्हते का? वय झाले म्हणून म्हाताऱ्या बापाला घरात कडी लावून बसविण्याची संस्कृती महाराष्ट्राची नाही, असा टोला माजी मंत्री व विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह फुटलेल्या नऊ आमदारांना कुडाळ येथील मेळाव्यात लगावला.
शरद पवार हे आजूबाजूला, पाठीमागे उभे राहिले तर बरे वाटतात, पण जर का ते कुरुक्षेत्रामध्ये विरोधक म्हणून समोर उभे राहिले तर समोरच्यांचा थरकाप उडवेल. त्यांचा झंझावात आता थांबवता येणार नाही, देशाला सोने देणाऱ्या या कोकणच्या भूमीने पवारांना नेहमी साथ दिली आहे. आता त्यांची ईर्षा जिवंत ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी व पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी मंत्री प्रवीण भोसले, रत्नागिरी सिंधुदुर्गच्या महिला जिल्हाध्यक्षा अर्चना घारे, माजी कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डान्टस, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर, तालुकाध्यक्ष शिवाजी घोगळे, रेवती राणे, अवधूत रेगे, जिल्हा सचिव भास्कर परब, सावली पाटकर, सचिन पाटकर, संग्राम सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले, पवार त्यावेळी काँग्रेसच्या विरोधात गेलेले असतानाही काँग्रेसचे राहुल गांधी पवार यांचे नेतृत्व मान्य करतात, पण अंगाखांद्यावर खेळवले ते फुटून जातात, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. पुरोगामी महाराष्ट्राची व सह्याद्रीची ताकद ठेवायची असेल, जातीपाती एकत्र ठेवायची असेल तर सर्वांनी पवार यांच्याच पाठीशी रहावे.
निसर्ग त्यांच्या पाठीशी
पवार भिजतात कारण त्यांच्या पाठीशी निसर्ग आहे, त्यामुळे तुम्ही, लोणावळ्यात सभा घ्या, असा टोला त्यांनी छगन भुजबळ यांना लगावला. तसेच दीपक केसरकर यांना पवार यांनी किती मदत केली ते विचारा. आता ते अजित पवार यांच्या गाडीच्या मागे धावतात, लाचारीची हद्द असते.
यावेळी शेखर माने म्हणाले, जिल्ह्यात पक्ष मजबूत आहे, काम न करणारे गेले. नऊ जणांच्या मागे अनेक चौकशी समित्या लागल्या होत्या त्यामुळे ते गेले. आता काही जण परत येऊ पाहत आहेत पण गद्दारांना क्षमा नाही.
प्रेमापोटी उपस्थित
यावेळी अमित सामंत म्हणाले, शरद पवार यांच्या प्रेमापोटी स्वत:हून हे सर्वजण उपस्थित राहिले. आजचा हा मेळावा पक्षाची ताकद दाखविण्यासाठी आहे. काहीजण माझ्याच चुकीमुळे पक्षात आले व इथे टेंडर मिळणार नाही, हे बघून मुंबईतून जाऊन दुसरीकडे जात पक्ष जिल्ह्यात नाही असे सांगतात. त्यांनी असाच मेळावा घेऊन दाखवावा, असे आव्हानही त्यांनी पक्ष बदलणाऱ्यांना दिले. यावेळी प्रवीण भोसले, अर्चना घारे, प्रसाद रेगे, अनंत पिळणकर, बाळ कनयाळकर यांनी मनोगत व्यक्त केले.