सावंतवाडी : रखडलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या प्रश्नात आपण लक्ष घालू असे आश्वासन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. याबाबत ते दिल्लीत रेल्वेमंत्र्यांशी २६ जूनला चर्चा करणार आहेत. त्यासाठी राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा म्हणून मला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आली असल्याची माहिती अर्चना घारे-परब यांनी दिली. यावेळी नियोजित बांदा-संकेश्वर महामार्ग सावंतवाडी शहरातून जाण्यासाठी पवार यांचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले. सावंतवाडी - मळगाव येथे रेल्वे टर्मिनस मंजूर झाले. त्याचे काम काही अंशी झाले. परंतु त्यानंतर या कामाला पुढे गती मिळालेली नाही. यातील बरेचसे काम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे टर्मिनस मंजूर असूनही कोणताही फायदा सावंतवाडीला झालेला नाही. वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला होता. त्यावेळी सावंतवाडीत वंदे भारतला थांबा देण्याची मागणी करण्यात आली.या पार्श्वभूमीवर घारे - परब यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून हा प्रश्न पक्षाध्यक्ष पवार यांच्याकडे मांडला. त्यावेळी हा प्रश्न सोडविणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांना दिल्लीत पाचारण केले आहे. येत्या २६ जूनला दिल्लीत याबाबत बैठक होणार आहे. त्यासाठी खासदार विनायक राऊत यांनाही बोलावण्यात आले आहे. त्यामुळे आम्ही दोघे तसेच पक्षातील महत्वाचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, असे घारे यांनी सांगितले.
सावंतवाडी रेल्वे टर्मिनसप्रश्नी शरद पवारांचा पुढाकार, रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करणार
By अनंत खं.जाधव | Published: June 23, 2023 5:18 PM