सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागाच्या साहित्य खरेदी प्रक्रियेबाबत समिती सदस्यांनी समितीला अंधारात ठेवल्याचा आरोप करीत सभागृहात हंगामा केला. समिती सदस्यांनीच खरेदी प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने पुन्हा एकदा महिला व बालविकास विभागाची साहित्य खरेदी प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागाची चालू आर्थिक वर्षातील अखेरची सभा सोमवारी सभापती स्नेहलता चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समिती सचिव सोमनाथ रसाळ, समिती सदस्या निकिता परब, वंदना किनळेकर, श्रावणी नाईक, रूक्मिणी कांदळगावकर, खातेप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.आजच्या सभेत महिला व बालविकास विभागाचा साहित्य खरेदी विषय गाजला. वाटप करण्यात येणाऱ्या शिलाई मशिन, सायकल, वजनकाटा आदी साहित्याचा नमुना सभागृहात न दाखविताच निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याबाबत सदस्या वंदना किनळेकर, निकिता परब यांनी आक्षेप घेतला तर समितीला अंधारात ठेवून या विभागाचा कारभार केला जात असल्याचा आरोप केला. यामुळे समिती सचिव सोमनाथ रसाळ आणि सदस्यांमध्ये खडाजंगी झाली. तर सभापती स्नेहलता चोरगे यांनाही लक्ष्य करण्यात आले. यामुळे सभागृहाचे वातावरण गरम झाले. मात्र समिती सचिव रसाळ यांनी निधी अखर्चित राहू नये म्हणून शासनाच्या दरपत्रकानुसार अधिकृत निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. साहित्याचे नमुने स्थायी समितीसमोर ठेवण्यात आले होते. त्यामुळे समितीला अंधारात ठेवण्याचा आरोप चुकीचा आहे. मात्र निविदा प्रक्रियेला विलंब झाला हे मान्य करीत यापुढे दक्षता घेतली जाईल, असे स्पष्ट केले. तर प्रत्येक तालुक्याला प्रस्तावांचे उद्दीष्ट देण्यात येते. मात्र तालुक्याकडून वेळीच प्रस्ताव येत नाहीत. तसेच आलेल्या प्रस्तावांमध्ये वारंवार बदल केला जात असल्याने या निविदा प्रक्रिया व लाभार्थी निवड प्रक्रियेला विलंब होत असल्याचे सांगत सदस्यांचे आरोप फेटाळून लावले. मात्र गेले वर्षभर सभागृहात साहित्य खरेदीवर आणि निधी खर्चावर चर्चा होऊनही वर्षअखेरीस आज होणाऱ्या सभेत निविदा प्रक्रियेला उशीर का? डिसेंबर- जानेवारीमध्ये निविदा प्रक्रिया का झाली नाही? खरेदी करण्यात येणाऱ्या साहित्याचे नमुने सभागृहात का दाखविले नाहीत. समितीला अंधारात ठेवून महिला व बालविकास विभागाचा कारभार केला जात असल्याचा खळबळजनक आरोप सदस्या वंदना किनळेकर आणि निकिता परब यांनी केल्याने पुन्हा एकदा महिला व बालविकास विभागाची साहित्य खरेदी प्रक्रिया चव्हाट्यावर आली आहे. सभापती चोरगे यांनीही सदस्यांनी केलेल्या आरोपांचे खंडन करीत गेल्यावर्षी खरेदी प्रक्रिया होऊ शकली नाही. लाभार्थी योजनांपासून वंचित राहिले. निधी अखर्चित राहिला याचा विचार करून यावर्षी प्रक्रिया राबविण्यात आली. गेल्या वर्षीचा कारभार निस्तारावा लागत असल्याचे सांगत सदस्यांच्या आरोपाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
‘ती’ साहित्य खरेदी संशयाच्या भोवऱ्यात अडकणार?
By admin | Published: March 30, 2015 9:49 PM