रत्नागिरी : शहरातील केतन स्वीट मार्टची कर चुकवल्या प्रकरणी चौकशी करुन दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय रत्नागिरी नगर परिषदेच्या सभेत नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी जाहीर केला. ही सभा नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत शहरातील केतन स्वीट मार्टचे कर चुकवेगिरी प्रकरण गाजणार हे निश्चित होते. केतन स्वीट मार्ट नगरसेवक उमेश शेट्ये यांच्या मालकीचे असून, त्यांनी कर चुकवल्याचे प्रकरण नगरसेवक मिलिंद कीर यांनी उघडकीस आणले होते. ऐन निवडणुकीच्या कालावधीत कीर यांनी पत्रकार परिषद घेऊन शेट्ये यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. कर चुकवेगिरी प्रकरण रत्नागिरी नगर परिषदेच्या सभेत कीर यांनी उचलून धरले. उमेश शेट्ये यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या विरोधात जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. मिलिंद कीर आणि त्यांच्यात निवडणुकीदरम्याने आरोप प्रत्यारोपही झाले. गेली १६ वर्षे म्हणजेच सन १९९९पासून केतन स्वीट मार्टचा कर चुकवण्यात आलेला आहे. सन १९९९साली उमेश शेट्ये नगरसेवक होते. त्यानंतर ते नगराध्यक्ष असतानाही हा कर भरलेला नसल्याचा आरोप कीर यांनी केला. त्यावेळी शेट्ये आणि कीर यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. कीर यांनी शेट्येंवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावेळी याप्रकरणी कायदेशीर चौकशी करण्यात येऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षांनी सभागृहासमोर स्पष्ट केले. शहरातील उद्यमनगर येथील संसारे उद्यानातील अवैध बांधकामप्रकरणी नगरसेवकांनी नगराध्यक्षांना धारेवर धरले. हे बांधकाम पाडण्यावरून जोरदार चर्चा झाली. आठवडा बाजारच्या मोकळ्या जागेत मार्केटसाठी इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीचा वापर मार्र्केट आणि आठवडा बाजारासाठी करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. (शहर वार्ताहर)
शेट्येंच्या केतन स्वीट मार्टला नगराध्यक्षांचा तिखट झटका
By admin | Published: November 10, 2015 9:13 PM