चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे शेखर निकम यांची सर्वानुमते फेरनिवड झाली आहे. प्रदेश निरीक्षक दत्ताजी मसूरकर हे निकम यांच्या नावाचा अहवाल प्रदेशकडे सादर करणार आहेत. त्यानंतर या नावाची औपचारिक घोषणा होईल.चिपळूण येथील पाग महिला विद्यालयात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हाध्यक्ष निवडीसाठी बुधवारी बैठक घेण्यात आली. पक्ष निरीक्षक दत्ताजी मसूरकर यांचे रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हाध्यक्ष शेखर निकम, शामराव पानवलकर, माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये, नगराध्यक्षा सावित्री होमकळस, सभापती समीक्षा बागवे, डॉ. नलिनी भुवड, बशीर मुर्तुझा, माजी पालकमंत्री रवींद्र माने, शौकत मुकादम, रमेश दळवी, विकास शेट्ये, आदी मान्यवर उपस्थित होते. प्रांतिकची यादी वाचताना चिपळूण तालुक्यातून माजी आमदार रमेश कदम यांचे नाव वाचण्यात आले. यावेळी राजापूर येथील प्रांतिक सदस्य सुशिराम मोरे यांनी कदम पक्षात आहेत का? असा थेट सवाल केला. त्यांच्याबरोबर महेंद्र गुजर हेही उभे राहिले होते. यावेळीमसूरकर यांनी हे मत प्रदेशपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले. त्याबाबत निर्णय घेण्याचा आपल्याला अधिकार नाही. आपण कदम यांच्याशी याबाबत चर्चा करू, असे सांगून या विषयाला बगल दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी पुन्हा शेखर निकम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2015 11:39 PM