मालवण : मुंबई ते गोवा असा समुद्रमार्गे प्रवास करीत असताना मुंबई येथील चार पर्यटकांसह शिडाची बोट वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक येथील खोल समुद्रात भरकटली. मालवण पोलीस व सागरी पोलीस समुद्री गस्त घालत असताना त्यांना सुमारे २५ ते ३० वाव खोल समुद्रात बोट असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी आपल्या ताब्यातील ‘अप्सरा’ या गस्तीनौकेच्या सहाय्याने भरकटलेल्या शिडाच्या बोटीला वाचविले. या बोटीतील इंधन संपल्याने तसेच समुद्रात वादळी वा-याची स्थिती असल्याने बोट भरकटल्याचे पर्यटकांनी सांगितले. हा प्रकार सोमवारी सकाळी १०.३० वाजता घडला.मुंबई येथील चार सहका-यांच्या चमूने ५ आॅक्टोबर रोजी पर्यटनासाठी गोव्याला जाण्याचा बेत आखला. मुंबई ते गोवा असा त्यांचा प्रवास ५ तारीखपासून शिडाच्या बोटीच्या सहाय्याने सुरू झाला. मात्र सध्या पश्चिम किनारपट्टीवर वादळी वा-यासह पावसाचे वातावरण असल्याने या पर्यटकांना समुद्रातून मार्गक्रमण करत असताना वेळोवेळी ‘आपण भरकटणार’ याची प्रचिती येत होती. सोमवारी सकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक समुद्रापासून सुमारे २५ वाव खोल समुद्रात त्यांची सुनीता नामक शिडाची बोट भरकटली. यात त्यांच्या बोटीतील इंधन (पेट्रोल) संपल्याने मिलिंद प्रभू, हेमंत आरोंदेकर, किरीट मगनलाल, जयदास चुनेकर हे चौघे पर्यटक काहीकाळ मृत्यूच्या दाढेत होते. पोलीस बनले देवदूतमालवण येथून सागरी पोलीस व मालवण पोलीस स्थानकाच्या पोलिसांचे समुद्रात ‘अप्सरा’ या गस्तीनौकेतून सकाळी ९ वाजता पेट्रोलिंग सुरू होते. यावेळी पोलिसांना निवती समुद्राच्या दिशेने खोल समुद्रात संशयास्पद बोट असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी बोटीपर्यंत जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला, तेव्हा पर्यटनासाठी पर्यटक आल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी बोटीचे इंधन संपले असल्याने आपण समुद्रात भरकटल्याचे सांगितले. यावेळी पोलिसांनी भर समुद्रात माणुसकीचे दर्शन घडवत त्यातील दोन पर्यटकांना वेंगुर्ले किनारी आणून त्यांना पुढील प्रवासासाठी इंधन उपलब्ध करून दिले. त्यामुळे मृत्यूच्या दाढेत असणाºया या चार पर्यटकांसाठी मालवण पोलीस जणू देवदूतच बनले. समुद्री गस्ती पथकात असणाºया पोलीस उपनिरीक्षक ए. बी. साठे, एस. पी. खांदारे, पी. डी. टेकाळे, पोलीस उपनिरीक्षक विलास तोरसकर, के. ई. कुमठेकर, झेड. एच. शिरगावकर, आशिष भाबल, महादेव साबळे यांच्या कामाचे पोलीस प्रशासन तसेच नागरिकांकडून कौतुक होत आहे.पर्यटक गोव्याच्या दिशेने रवानापोलिसांनी पर्यटकांना पुढील गोवा प्रवासासाठी इंधनाची सोय करून दिल्यानंतर ‘त्या’ चारही पर्यटकांनी पोलिसांचे आभार मानले. आमच्यासाठी तुम्ही देवदूत ठरलात. आमच्या बोटीतील इंधन संपले तसेच समुद्रातही हवामान खराब असल्याने बोट भरकटल्याचे आम्हांला समजले. मात्र कोणाशीही संपर्क होत नसल्याने आम्ही खूप घाबरलो होती. त्यावेळी एवढ्या खोल समुद्रात तुम्ही दाखविलेले माणुसकीचे दर्शन कधीच विसरणार नाही, असे सांगत ते पर्यटक भावनाविवश झाले. त्यानंतर पोलिसांनी वेंगुर्ले बंदर येथून त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्यानंतर त्यांनी गोव्याच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली.
निवती समुद्रात पर्यटकांची ‘शिडा’ची बोट भरकटली; पोलिसांच्या सतर्कतेमुळे चौघांना वाचविण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2017 10:14 PM