कुडाळ (सिंधुदुर्ग) ,दि. १० : निराधारांची सेवा करावी या उद्देशाने स्थापन झालेला सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट भविष्यात उत्तरोत्तर प्रगती करेल व सर्व निराधारांना अनाथ सेवाश्रमाच्या माध्यमातुन चांगली सेवा हा ट्रस्ट देईल असे प्रतिपादन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी ट्रस्टच्या वतीने अनाथ सेवाश्रमाच्या बांधण्यात आलेल्या नुतन इमारतीच्या शुभारंभी प्रसंगी केले.
सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने माड्याचीवाडी रायवाडी येथेु समाजातील अनाथ बालके, तरूण, वृध्द महीला- पुरूष या निराधारांना आधार देण्यासाठी एक वर्षापुर्वी अनाथ सेवाश्रम सुरू केला होता. आता या अनाथ सेवाश्रमाची नुतन वास्तु ट्रस्टने बांधली असुन या नुतन वास्तुमध्ये सुमारे ७० निराधारांना सेवा देण्यात येणार आहे.
या नुतन वास्तुचे उद्घाटन चाचरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई, माड्याची वाडी सरपंच शितल कदम, चाचरकर, जि. प. सदस्या वर्षा कुडाळकर, कुडाळचे माजी सरपंच अरविंद शिरसाट, डॉ. योगेश नवागुंळ, कुडाळ हायस्कुल ज्युनियर कॉलेजचे माजी प्राचार्य का. आ. सामंत, ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सुरेश बिर्जे, माजी जि. प. अध्यक्ष विकास कुडाळकर, राजु बिर्जे, डॉ. सुधीर राणे, भाई तळेकर, अशोक तेजम, नाना राऊळ हे उपस्थित होते.
यावेळी रणजित देसाई म्हणाले की, या ट्रस्टने अनोखा उपक्रम सुरू केला कारण अनाथ आश्रम असे नाव देता अनाथ सेवाश्रम दिले असुन या नावातच.सेवाभाव आहे असे सांगितले. सुरेश बिर्जे व त्यांचे कुटुंबिय मोठ्या प्रमाणात खडतर परिश्रम करून ते मोठे झाले असुन आपण समाजाचे देणं लागतो या भावनेने त्यांनी निराधारांसाठी सुरू केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगितले.जगातील महागडा बिछाना सांभाळताहेत बिर्जे. रणजित देसाईजगातील सर्वात महागडा बिछाना हा वृध्द किंवा आजारी माणसाचा असतो कारण या बिछान्याची जबाबदारी कोणीही घ्यायला तयार नसतो मात्र निराधार, वृध्द यांची सेवा करण्यासाठी पुढाकार घेतलेले बिर्जे व त्यांचा ट्रस्ट हा जगातील महागडा बिछाना सांभाळताहेत असुन त्यांचे काम गौरवास्पद असल्याचे रणजित देसाई यांनी सांगितले.आरोग्य सेवेबरोबरच सर्व सहकार्य करू.- डॉ. योगेश नवागुंळदान देण्यासाठी गर्भ श्रीमंतीची गरज नसते हे बिर्जे कुटुंबियांच्या व त्यांच्या ट्रस्टचे काम पाहुन लक्षात येते. त्यांच्या या कार्याला सर्व प्रकारच्या आरोग्य सेवे बरोबरच इतर ही सेवा देण्यासाठी सहकार्य करू असे प्रतिपादन डॉ. नवागुंळ यांनी करीत जिल्ह्यातील सर्व अनाथ आश्रमांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी संघटना करून त्याचे अध्यक्षपद सुरेश बिर्जे घ्यावे असे सांगितले.
यावेळी इतर मान्यवरांनी ही आपली मनोगते व्यक्त करून ट्रस्टच्या सहकार्य करणार असल्याचे सागंत उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी काहीनी ट्रस्टला आर्थिक सहाय्य केले तसेच चाचरकर यांनी पुस्तक रूपी भेट ट्रस्टला दिली.अविरत सेवा देण्यासाठी प्रयत्नशील- सुरेश बिर्जे.अनाथ सेवाश्रम आणि गावासाठी ट्रस्टच्यावतीने रूग्णवाहिकेची सेवाही सुरू करण्यात येणार असून वेळोवेळी आरोग्य शिबिरेही घेण्यात येणार तसेच सेवाश्रमाच्या परिसरात सात एकरची जमीन ट्रस्टची असून आंबा, काजू कलमे आहेत.
येथे लवकरच गोशाळा सुरू करण्यात येईल तसेच सर्व प्रकारच्या सेवा अविरतपणे कशी देता येईल यासाठी नेहमीच कार्यरत असणार असल्याचे बिर्जे यांनी सांगितले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुंदर मेस्त्री यांनी केले.