बांदा (जि. सिंधुदुर्ग) : बांदावासीय माकडतापाशी सामना करीत आहेत. सद्य:स्थितीत ही साथ पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थ, वन, पशुसंवर्धन व आरोग्य खात्याच्या समन्वयातूनच प्रयत्न करणे गरजेचे आहे. लसीकरणापेक्षा परिसरात फवारणी करणे, अंगाला आॅईल लावून जंगलात जाणे, मृत माकडाची तत्काळ विल्हेवाट लावणे या बाबींवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. माकडताप हा संसर्गजन्य रोग नसून, हा रोग केवळ दूषित गोचीड चावल्यानेच होत असल्याने स्थानिकांनी गोचिडींपासून स्वत:ला सुरक्षित ठेवावे, असे आवाहन शिमोगा येथूून आलेल्या विशेष पथकातील डॉ. किरण यांनी केले.बांदा सटमटवाडी परिसरात थैमान घातलेल्या माकडताप आजाराविषयी स्थानिकांमध्ये जनजागृती व मार्गदर्शन करण्यासाठी शिमोगा येथील विशेष टीम बांद्यात शुक्रवारी सकाळी दाखल झाली. या पथकामध्ये डॉ. किरण यांच्यासह डॉ. संध्या, डॉ. वीरभद्र यांचा समावेश आहे. बांदा सटमटवाडी येथे ग्रामस्थांनाया टीमने मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, उपवनसंरक्षक रमेश कुमार, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, दोडामार्ग तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार चिपळूणकर, जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, सरपंच बाळा आकेरकर तसेच सटमटवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)स्थानिकांनी योग्य काळजी घ्यावीडॉ. किरण यांनी माकडतापाची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्हावासीय गेली ५0 वर्षे माकडतापाचा सामना करीत आहेत. ही साथ समूळ नष्ट होत नाही. या आजारावर विशिष्ट असे औषध उपलब्ध नाही. माकडांच्या शरीरावर असलेल्या दूषित गोचीड या माणसाच्या शरीराला चावल्यास हा आजार फैलावतो. या तापाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिसरात आॅगस्ट ते सप्टेंबर या कालावधीतच लसीकरण करणे हे योग्य आहे. आताच्या कालावधीत लसीकरण करून त्याचा काहीही उपयोग होत नाही. लस घेतल्यानंतरही ताप येणार नाही, याची खात्री नसल्याने स्थानिकांनी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.वन, पशुसंवर्धन विभागाला मार्गदर्शनमाकड मृत झाल्यानंतर गोचीड माकडाचे शरीर तत्काळ सोडतात. त्यासाठी मृत माकडाची तातडीने विल्हेवाट लावणे, तसेच मृत माकडाच्या आजूबाजूकडील २० मीटर क्षेत्रात फवारणी करणे या गोष्टी प्राध्यान्याने होणे गरजेचे आहे. अति फवारणी केल्याने माणसाच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. यासाठी ज्या ठिकाणी माकड मृत झाले आहे, त्या ठिकाणीच फवारणी करणे योग्य आहे. यावेळी स्थानिकांच्या विविध शंकांचे निरसन टीमकडून करण्यात आले. वन, पशुसंवर्धन व आरोग्य विभागाने कोणती खबरदारी घ्यावी याबाबतही डॉ. किरण यांनी मार्गदर्शन केले.
शिमोगाचे वैद्यकीय पथक बांद्यात दाखल
By admin | Published: March 17, 2017 11:25 PM