बांदा : सद्यस्थितीत तेरखोल नदीपात्रातून सुरु असलेल्या होडीसेवा नियमांमध्ये शिथिलता आणावी, यासाठी राज्याचे बंदरे व वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी बंदरखात्याच्या अधिकाऱ्यांचा सूचना दिल्या आहेत. तसेच यासंदर्भात आरोसबाग येथे १७ आॅगस्ट रोजी मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी व ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेणार असल्याचे मंत्री चव्हाण यांनी सांगितल्याची माहिती भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी पत्रकारांना दिली. मेरिटाईम बोर्डाने तेरेखोल नदीपात्रातील शेर्ले व आरोसबाग येथील होडीसेवा ही अनधिकृत असल्याचे सांगत ही होडीसेवा तत्काळ बंद करण्याचे लेखी आदेश दोन्ही ठिकाणच्या होडीचालकांना दिले होते. त्यामुळे येथील पुलाचा प्रश्न हा पुन्हा चर्चेत आला होता. आरोबागवासियांना होडीशिवाय पर्यायी रस्ताच उपलब्ध नसल्याने येथील होडीसेवा सुरु ठेवावी, याबाबत भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, बांदा सरपंच मंदार कल्याणकर, माजी सरपंच शीतल राऊळ, आरोसबाग येथील ग्रामस्थ संजय चांदेकर यांनी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी राज्यमंत्री चव्हाण यांनी सविस्तर माहिती घेऊन याबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.तसेच राज्यमंत्री चव्हाण यांनी होडीअभावी स्थानिकांची गैरसोय होऊ नये यासाठी आपण सहाय्यक बंदर निरिक्षक अनंत गोसावी यांच्याशी चर्चा केली आहे. आरोसबागवासियांनी सुरक्षिततेच्या साधनांचा वापर करुन काळजीपूर्वक पाण्यातून होडी चालवावी. तसेच बांदा-शेर्ले नदीतीरावरील होडीसेवेच्या परवान्याच्या अटी या जाचक असल्याने या अटींमध्ये काही त्रुटी असल्यास त्यामध्येही शिथिलता आणावी, अशी सूचना आपण बंदर खात्याच्या अधिकाऱ्यांना दिली असल्याचे मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.बांदा-आरोसबाग येथील पुलाच्या निविदा प्रक्रियेची सुरुवात झाली असून येत्या दोन महिन्यांमध्ये या पुलाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे आरोसबागवासियांनी निश्चिंत रहावे, या पुलाच्या कामाची पूर्ण जबाबदारी आम्ही स्वीकारली असल्याचे सरपंच मंदार कल्याणकर यांनी यावेळी सांगितले. १७ आॅगस्ट रोजी आरोसबाग येथे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणाऱ्या ग्रामस्थ व मेरिटाईम बोर्ड अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत होडीसेवेबाबत कायमस्वरुपी तोडगा काढण्यात येणार असल्याचे कल्याणकर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)आरोसबाग नदीपात्रातील प्रस्तावित पुलाच्या कामाची निविदा प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर सुरु करण्यात आली असून पुलाच्या प्रत्यक्ष कामास लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी निश्चिंत रहावे.- अतुल काळसेकर, भाजपा, माजी जिल्हाध्यक्ष
होडी वाहतुकीत शिथिलतेच्या सूचना
By admin | Published: August 09, 2016 10:04 PM