कणकवली: सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे खंदे समर्थक, प्रचार प्रमुख, करंजेचे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबरला प्राणघातक हल्ला झाला होता. याप्रकरणी ५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या पाच आरोपींना आज, शनिवारी पुन्हा कणकवली न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी नरडवे नाका तसेच न्यायालय परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.कणकवली न्यायालयात शनिवारी संशयित आरोपींना हजर केले असता सरकारी पक्षातर्फे आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली. या गुन्ह्यात अन्यही काही आरोपींचा हात आहे. तसेच अन्य दोन आरोपींना अटक करायची आहे. त्यामुळे ५ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाकडे पोलिसांनी केली.त्यावर आरोपींच्यावतीने वकिलांनी बाजू मांडताना तपास करण्यासाठी यापूर्वी दोन वेळा पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यामुळे आता पुन्हा पोलस कोठडीत वाढ करु नये, असे म्हणणे मांडले. त्यावर सुनावणी करत कणकवली न्यायालयाने पाचही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आरोपींची रवानगी सावंतवाडी कारागृहामध्ये करण्यात येणार आहे.या पार्श्वभूमीवर कणकवली शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी कणकवली मध्ये दंगल नियंत्रण पथक व आर.सी. पी पथक सज्ज ठेवण्यात आले होते.
शिवसैनिक संतोष परब खुनी हल्लाप्रकरण : 'त्या' पाचही आरोपींना न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2021 4:10 PM