अनंत जाधवसावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यात झालेल्या अकरा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत आठ ग्रामपंचायतींवर भाजपने कमळ फुलवित शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात जोरदार मुंसडी मारली आहे. त्यामुळे भाजपमध्ये नवचैतन्य पसरले असून शिवसेनेला आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. आमदार दीपक केसरकर यांनी मतदार संघाकडे फिरविलेली पाठ आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमधील अतिआत्मविश्वास यामुळेच पराभवाची चव चाखावी लागली आहे.विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकला. मात्र, गेल्या वर्षभरात झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला सर्वच ठिकाणी पराभवाची चव चाखावी लागली होती. शिवसेनेनेही मेहनत घेतली खरी पण आपणच जिंकणार याचा अतिआत्मविश्वास शिवसेनेत दिसत होता. त्यातच राज्यातील सत्ता आपल्याकडे, जिल्ह्याचे पालकमंत्री आपले त्यामुळे गड काबीज करू असे शिवसेनेला वाटले होते. पण भाजपने शिवसेनेच्या गडाला सुरूंग लावत एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
तालुक्यात भाजपकडे सक्षम नेता नाही. संजूू परब हे नगराध्यक्ष असल्याने सावंतवाडी शहरात अडकून पडले तर माजी तालुकाध्यक्ष महेश सारंग यांच्या कोलगाव गावातील निवडणूक असल्याने त्यांचे ते होमपीच असल्याने ते तेथे अडकून पडले होते. असे असतानाही शिवसेनेच्या एकाही नेत्याला याचा फायदा उठवता आला नाही.अकरापैकी आठ ग्रामपंचायती भाजपने सहज हिसकावून घेतल्या आहेत. कोलगाव तसेच आंबोली, चौकुळ व दांडेलीमधील भाजपचा विजय शिवसेनेच्या जिव्हारी लागणारा आहे.भविष्यात भाजप मतदारसंघावरही कमळ फुलवेलसत्ता असूनही शिवसेनेची पाटी कोरीच असल्यासारखी स्थिती आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेची अशीच परस्थिती राहिली तर भविष्यातील विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी मतदार संघावर भाजप आपले कमळ फुलवेल असे दिसून येत आहे.