तळेरे : तोंडवली-बावशी ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याचे पहावयास मिळत आहे. कारण शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांनी प्रचाराचे नारळ फोडले असून दोन्ही पक्षांची वरिष्ठ मंडळी या गावात दाखल झाल्याने खऱ्या निवडणूक रणधुमाळीला सुरुवात झाल्याचे दिसत आहे. या ग्रामपंचायतीची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरत आहे.१५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत कणकवली तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यात तोंडवली बावशी ग्रुप, भिरवंडे, गांधीनगर अशा ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यापैकी गांधीनगर ग्रामपंचायत बिनविरोध झाली असल्याने कणकवली तालुक्याचे लक्ष तोंडवली-बावशी व भिरवंडे ग्रामपंचायतींकडे लागले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तोंडवली बावशीमध्ये ७ जागांसाठी ३२ अर्ज दाखल केले होते. त्यातील काहींनी डमी अर्ज मागे घेतल्याने एकूण १५ अर्ज राहिले असून भाजपा व शिवसेना यांच्यात दुरंगी लढत होणार असून काही ठिकाणी तर तिरंगी लढत दिसत आहे.तोंडवली-बावशी ग्रामपंचायत निवडणुकीचा भाजपाच्यावतीने प्रचाराचा नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी कणकवली तालुका मंडळ अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा अध्यक्ष गणेश तळगावकर, जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, शक्ती केंद्रप्रमुख भाई मोरजकर आदी उपस्थित होते.तसेच शिवसेनेच्यावतीनेही प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, उपजिल्हा प्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले आदी उपस्थित होते.