दोडामार्ग : तालुक्यातील माटणे मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून असणारी भाजपची पर्यायाने भाजप नेते राजेंद्र म्हापसेकर यांची एकहाती सत्ता शिवसेनेने मोडीत काढली. भाजपचे पंचायत समिती सदस्य भरत जाधव यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी माटणे मतदारसंघात शिवसेना, भाजप व काँग्रेस आघाडी अशी तिरंगी लढत झाली. मात्र शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी काँग्रेस आघाडी व भाजपला धोबीपछाड करीत निर्विवाद विजय मिळविला.धुरी यांनी भाजपाचे उमेदवार रुपेश गवस यांचा ६८५ मतांनी पराभव केला. त्यामुळे सहा सदस्यीय दोडामार्ग पंचायत समितीत शिवसेनेचे संख्याबळ तीन झाले असून विरोधी पक्षांचे संख्याबळही तीन असल्याने आता आकडा समसमान झाला आहे. बुधवारी झालेल्या माटणे पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत बाबुराव धुरी यांना १७३६ मते, भाजपाचे रुपेश गवस यांना १०५१ तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्यवान गवस यांना अवघी ८० मते पडली.गुरुवारी सकाळी १० वाजल्यानंतर मतमोजणी सुरू झाल्यावर सुरुवातीपासूनच बाबुराव धुरी आघाडीवर होते. ती आघाडी कमी करण्यास भाजपला शेवटपर्यंत यश आले नाही. दोडामार्ग पंचायत समितीत एकूण सहा सदस्य असून या विजयामुळे शिवसेना पक्षाचे निम्मे सदस्य आहेत. काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे प्रत्येकी एक सदस्य राहिल्यामुळे शिवसेनेची पंचायत समितीमधील तसेच तालुक्यातील ताकद वाढल्याचे चित्र दिसत आहे.भाजपाच्या बालेकिल्ल्याला सुरूंगमाटणे जिल्हा परिषद मतदारसंघ हा गोवा राज्याला अगदी लागून असून या मतदारसंघाचे नेतृत्व गेल्या अनेक वर्षांपासून भाजपा पक्षाने केले आहे. भाजपाचे नेते व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर याच मतदारसंघातून एक वेळा पंचायत समितीवर तर दोन वेळा जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपपेक्षा राजेंद्र म्हापसेकर यांचाच बालेकिल्ला राहिला होता. मात्र त्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्याचे काम शिवसेनेने पर्यायाने तालुकाध्यक्ष बाबुराव धुरी यांनी केले.शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहमाटणे मतदारसंघात मजबूत असणा-या भाजपला जोरदार धक्का देण्यात शिवसेनेला कमालीचे यश मिळालेले आहे. शिवसेना पक्षाने पर्यायाने बाबुराव धुरी यांनी तीन वर्षांपासूनच या भागातील अनेक गावात जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली होती. त्यात त्यांनी आपला जनसंपर्क कमालीचा वाढविला होता. त्यामानाने भाजपचे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर कमी पडल्याचे दिसत होते. वर्षभरापूर्वीच्या जिल्हा परिषद निवडणुकीतही पूर्वीसारखे मताधिक्य म्हापसेकर यांना राखता आले नव्हते. मतमोजणी प्रक्रिया सुरू झाल्यावर शिवसेना कार्यकर्त्यात कमालीचा उत्साह वाढत होता.
शिवसेनेकडून भाजपाला धोबीपछाड, माटणेत निर्विवाद वर्चस्व
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 8:25 PM