कुडाळ - कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकी दरम्यान शिवसेना-भाजपामध्ये मोठा राडा झाला. आमदार वैभव नाईक यांची गाडी रोखल्याने भाजपा- शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. यानंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुकी देखील झाली. यामुळे येथील वातावरण तणावपुर्ण बनले आहे.कुडाळ नगरपंचायतमध्ये आज नगराध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. निवडणूक असल्याने नगरपंचायत मार्गावरील वाहतूक पोलिसांनी बंद केली होती. यावेळी काँग्रेसचे उमेदवार घेवून आमदार वैभव नाईक नगरपंचायत येथे आले. नगरपंचायत परिसरात बंदी असताना आमदार नाईक यांची गाडी नगरपंचायत कार्यालय येथे कशी काय येवु दिली? असा जाब भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलिसांना विचारला. तर, पोलिस प्रशासनाच्या भुमिकेबाबत भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी आमदार वैभव नाईक यांची गाडी रोखल्याने शिवसेना-भाजपा पदाधिकार्यांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची होत धक्काबुकी झाली. यामुळे येथील वातावरण तंग बनले.दरम्यान पोलिस प्रशासनाने आमदार वैभव नाईक यांची गाडी तेथे न थांबविता पुढे नेण्यास सांगितले. तसेच दोन्हीही पक्षाच्या पदाधिकार्यांना पोलिसांनी बाजुला केल्यामुळे हा वाद काही काळ शमला पण वातावरण तंग बनले होते.