सावंतवाडी: पांढऱ्या कपडयावर कोट चढवला म्हणजे कोण नेता होत नाही, वाडोस ग्रामपंचायतची निवडणूक लढवून पहिले निवडून या आणि नंतर शिवसेना नेत्यांवर बोला. देणेकरी येणार म्हणून घराच्या अंगणात कुत्रे बांधता हे सर्वाना माहीतीय, बोलायला लागलो तर पळता भुई थोडी होईल असा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार याच्यासह पदाधिकाऱ्यांनी विशाल परब यांना दिला. सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी बोलताना कासार म्हणाले, विशाल परब यांची खासदार राऊतावर बोलण्यातही उंची नाही. ते सावंतवाडीत राहून काय धंदे करतात हे बाहेर काढल्यास त्यांना पळताभुई थोडी होईल. आरोंदा रेडी, सावंतवाडी, माणगाव येथील जमिनीचे व्यवहार लक्षात घेता काय काय उपद्व्याप आहेत समजून घ्यावेत. स्वतःच्या बंगल्यात राहताना बाहेर कुत्रे सोडून राहावे लागते ही वस्तुस्थिती आहे मग हे कुत्रे कशासाठी बांधता देणेकरी येणार म्हणून का अशीच आम्हाला शंका येते असे ते म्हणाले. नेता व्हायच असेल तर आधी स्वतःच्या गावची निवडणूक लढवून दाखवावी. वाडोस येथून ग्रामपंचायतमध्ये निवडून या आणि नंतर आमच्या नेत्यांवर टिका करा असा सल्ला ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.दादागिरी आणि गुंडगिरी करणे हे शिवसैनिकांचे काम नाही ते विशाल परब यांनाच जमते. त्यामुळे खासदारांवर, विकासकामावर टिका करण्याआधी शासकिय मेडिकल कॉलेजला मिळालेली मंजूरी कोणी थांबविली हे आधी त्यांनी आपल्या नेत्यांना विचारावे असेही कासार म्हणाले. आणि आता यापुढे जर अशीच टिका झाली तर परब यांना घरातून बाहेर पडणे अवघड करू असा इशारा यावेळीही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.या पत्रकार परिषदेस उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, इन्सूली सरपंच तात्या वेंगुर्लेकर, ओवळिये सरपंच अबजू सावंत, योगेश नाईक, वेत्ये येथील गुणाजी गावडे नाना पेडणेकर आदी उपस्थित होते.
'पांढऱ्या कपडयावर कोट चढवला म्हणून नेता होत नाही'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 7:35 PM