राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. महाविकास आघाडीसह अन्य नेतेही राज्यपाल हटाव या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत आहे. उदयनराजे आणि संभाजीराजे यांनीही आक्रमक पवित्रा घेत राज्यपाल कोश्यारींवर सडकून टीका केली आहे. तर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी परत जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा शिंदे गटातील एका भरत गोगावले यांनी केला होता. आता, स्वत: राज्यपालांनी हे पद आपल्यासाठी दु:ख असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, यानंतर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी राज्यपालांवर भाष्य केलं.
“राज्यपालांना केंद्राकडून योग्य त्या सूचना आल्या असून त्यांनी त्यानंतर कोणतेही चुकीचे वक्तव्य केले नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी याबाबत केंद्राकडे आपल्या भावना बोलून दाखवला होत्या,” असं मत केसरकर यांनी सावंतवाडीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. यावेळी बोलताना त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरही भाष्य केलं. मंत्रिमंडळ विस्तार लवकरात लवकर व्हावा अशी सर्वाची अपेक्षा आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जोपर्यंत मला सांगत नाही तोपर्यंत आपण प्रवक्ता म्हणून काही बोलणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं.
पवारांनी शिवसेना संपवायचं कामकेलंशरद पवार यांनी शिवसेना संपवायचे काम केले आहे. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन चाललो आहोत. त्यामुळेच भाजप सोबत युती केली आणि पुढच्या निवडणुका एकत्र लढवणार असल्याचेही केसरकर यांनी सांगितले.
बाळासाहेबांची शिवसेना मुळे मुंबईतील मराठी माणसाला आधार मिळाला असून मुंबईत पुन्हा एकदा मराठी माणूस ताठ मानेने फिरेल, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असतना अडीच वर्षांत काय केले? आठवडा आठवडा भर ते मंत्रालयात गेले नाहीत, असं म्हणत केसरकर यांनी टीकेचा बाण सोडला. पैशासाठी फुटलो असतो तर बिर्ला टाटा मुख्यमंत्री झाले असते, असंही त्यांनी नमूद केलं. राज ठाकरे यांनी गुजरात मध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं होते. मग नाव कशाला ठेवता सरकारला सहकार्य करा, असं केसरकर म्हणाले.