रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असून बहुतांश ग्रामपंचायतींवर गेल्या पाच वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीच्यावेळी एक मोठा गट राष्ट्रवादी कॉँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झाल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत जुन्या-नव्या शिवसैनिकांचा वाद उफाळला आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींमध्ये उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांनी बंडखोेरी करून पक्षालाच आव्हान दिले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांची दमछाक झाली आहे. विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीचा एक गट अचानकपणे सेनेत डेरेदाखल झाला. राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते या गटात होते. मात्र, या गटाला सेनेत घेण्यास त्यावेळीही शिवसैनिक व काही सेना नेत्यांचा प्रखर विरोध झाला होता. त्यामुळे सेनेत गटबाजी होणार असे चित्र निर्माण झाले होते. त्याचा प्रत्यय तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्यावेळी आला आहे. जुन्या गटाचे आजही ग्रामपंचायत निवडणुकीवर वर्चस्व आहे. त्यातही ज्या जुन्या शिवसैनिकांना उमेदवारी नाकारण्यात आली त्यांनी थेट बंडखोरी केली आहे. नव्या शिवसैनिकांनीही उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करत पक्षाला आव्हान दिले आहे. अनेकांनी राष्ट्रवादी व भाजपाच्या झेंड्याखाली आश्रय घेत उमेदवारी दाखल केली आहे.तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमधून सेनेच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे. त्यातील काहीजणांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावण्यात सेनेला यश आले असले तरी मोठ्या प्रमाणातील बंडखोरी मोडून काढता आलेली नाही. तसेच राष्ट्रवादी व भाजपाच्या आश्रयाने सेनेच्याविरोधात लढणाऱ्या उमेदवारांमुळे अनेक ग्रामपंचायती पुन्हा राखण्यात सेनेला अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये सर्वाधिक बंडखोरी झाली आहे, त्यामध्ये मिरजोळे, नाचणे, पाली, कर्ला, कोतवडे, मजगाव, सोमेश्वर, काळबादेवी, बसणी आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यातील मिरजोळे ग्रामपंचायत गेल्या अनेक वर्षांपासून सेनेकडे आहे. मात्र, यावेळी या ग्रामपंचायतीत सेनेपुढे सर्वाधिक मोठे बंडखोरीचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यातून मार्ग काढताना नेते हैराण झाले आहेत. तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेतील बंडखोरी टिपेला पोहोचली असून तीन जागांसाठी शिवसेनेच्या ९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. ही बंडखोरी शमविणार कशी असा प्रश्न सेना नेत्यांसमोर आहे. एकला चलो रे काही जागांचा अपवाद वगळता सर्वच जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा उतरली असून ‘एकला चलो रे’मुळे आमच्या कार्यकर्त्यांनाही न्याय मिळाला आहे. युती असताना कमी जागांवर तडजोड करावी लागत होती. आता युती नसल्याने जिल्ह्यात भाजपा विरोधात सेना अशी मुख्य लढत होणार आहे. रत्नागिरी तालुक्यात सेनेला बंडखोरीने ग्रासले असून भाजपाचे ग्रामपंचायतींवर वर्चस्व निर्माण होईल.-सचिन वहाळकर, जिल्हाध्यक्ष, भाजपा, रत्नागिरी. धक्का बसण्याची शक्यता गेल्या निवडणुकीत तालुक्यातील ८५ टक्के ग्रामपंचायतींवर शिवसेनेने आपले वर्चस्व निर्माण केले होते. यावेळी जुन्या-नव्या शिवसैनिकांना निवडणुकीत सामावून घेताना सेना नेत्यांची कसरत झाली व बंडखोरीचे ग्रहण लागले. त्यामुळे या निवडणुकीत सेनेच्या ग्रामपंचायतींवरील वर्चस्वाला धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यात भाजपा व राष्ट्रवादीची स्थिती सुधारण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. बंडखोरीचा परिणाम नाही - साळवीतालुक्यात सेनेअंतर्गत काही प्रमाणात बंडखोरी झाली आहे हे मान्य आहे. बंडखोरांची समजूत काढली आहे. या बंडखोरीचा शिवसेनेच्या तालुक्यातील वर्चस्वावर परिणाम होणार नाही. गतवेळेप्रमाणेच यावेळीही शिवसेना ५३ पैकी ४५ ग्रामपंचायतींवर आपले राजकीय वर्चस्व निर्माण करील, असा दावा शिवसेनेचे रत्नागिरी तालुकाप्रमुख प्रदीप तथा बंड्या साळवी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
शिवसेनेत उफाळला जुना-नवा वाद!
By admin | Published: April 10, 2015 11:28 PM