कणकवली : केंद्रातील भाजपा सरकारच्या प्रस्तावित प्रकल्पाना शिवसेना विरोध करत आहे. नाणार रिफायनरी प्रकल्प, सी-वर्ल्ड प्रकल्प ,आयुर्वेदीक वनस्पतींवर संशोधन करणारे केंद्र असे प्रकल्प नको असतील तर ठाकरे सरकारला नेमके काय हवे आहे ? ते तरी त्यांनी स्पष्ट करावे. लोकोपयोगी प्रकल्प नाकारणाऱ्या राज्यातील ठाकरे सरकारचा आम्ही धिक्कार करतो. असे भाजपा प्रदेश सचिव ,माजी आमदार प्रमोद जठार यांनी म्हटले आहे.त्यांनी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोकणाचा विकास कसा करायचा? हे शिवसेनेने आता जाहीर केले पाहिजे. शिवसेनेच्या आडमुठ्या भूमिकेमुळे कोकणात प्रकल्पांना कोणी जागा देता का ? असे म्हणण्याची वेळ केंद्र सरकारवर आली आहे.
आता आणखी काय केले तर केंद्राच्या या पर्यावरण पुरक आयुर्वेदीक वनस्पतीवर संशोधन करणाऱ्या प्रकल्पाला शिवसेना सरकार सिंधुदुर्गात दोडामार्ग - आडाळी येथे जागा देईल ? हेच समजत नाही. ठाकरे सरकारचे कोकणावरचे प्रेम हेच आहे का ? असा प्रश्न आम्हाला पडतो.केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सिंधुदुर्गात आयुर्वेदीक वनस्पतींवर संशोधन करणारा प्रकल्प व्हावा म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली आहे. मात्र, कोकणातील आमदारांच्या जिवावर उभे असलेल्या ठाकरे सरकारचे मंत्री प्रकल्प लातुरला पळवत आहेत, त्याचा आम्ही धिक्कार करत आहोत.शिवसेनेच्या खासदारांना सिंधुदुर्गातील तसेच कोकणातील जनतेला न्याय द्यावाच लागेल. अन्यथा पुढील काळात कोकणातून शिवसेनेला जनताच हद्दपार करेल,असा इशाराही प्रमोद जठार यांनी या दिला आहे.