सावंतवाडी : गेले काही दिवस शिवसेनेवर नाराज असलेले सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी उभयतांमध्ये पंधरा मिनिटे चर्चा झाली.
यात सावंतवाडी मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे संकेत साळगावकरांना दिल्याचे बोलले जात आहे. मात्र, पुढील दोन दिवसांत साळगावकर आपली भूमिका जाहीर करणार आहेत. या भेटीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रांतिक सदस्य एम. के. गावडे उपस्थित होते.बबन साळगावकर हे सावंतवाडी नगरपालिकेत शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले असले तरी गेल्या काही दिवसांपासून ते शिवसेनेवर नाराज होते. अनेकवेळा त्यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीकाही केली होती. मात्र, पंधरा दिवसांपूर्वी साळगावकर यांनी मंत्री केसरकर यांच्यावर जादूचे आरोप करत राज्यात खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे ते शिवसेनेपासून लांब जाणार हे निश्चित झाले होते.
साळगावकर हे जरी शिवसेनेचे नगराध्यक्ष असले तरी गेल्या काही दिवसांपासून सतत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात होते. त्यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा होती. त्यामुळेच त्यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन इच्छा व्यक्त केली. जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनीही साळगावकर हे सावंतवाडी मतदारसंघातून तुल्यबळ लढत देऊ शकतात हे पक्षाध्यक्षांना पटवून दिल्याने पक्षाने साळगावकर यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत.दोन दिवसांनी भूमिका जाहीर करणारसावंतवाडी मतदारसंघातून एम. के. गावडेही विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक होते. मात्र, साळगावकर यांचे नाव पुढे आल्याने ते थांबतील, असे सांगितले जात आहे. साळगावकर हे दोन दिवसांनी मुंबईतून सावंतवाडीत येणार आहेत. त्यानंतर ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत.