कणकवली : शिवसैनिकांना सांगून स्वत:ला वाघ म्हणवून घेणाऱ्या वैभव नाईक यांचे अजितदादांसमोर मांजर कसे झाले? २४० कोटींचा आराखडा ११८ कोटी रुपयांचा मंजूर कसा झाला? या अपयशाला शिवसेनेचे खासदार, पालकमंत्री, आमदार जबाबदार आहेत, असा आरोप भाजपा आमदार नीतेश राणे यांनी कणकवली येथे केला.ते म्हणाले, जिल्हा नियोजनच्या सभागृहात सत्ताधाऱ्यांच्या विकासनिधीच्या वक्तव्यांवर बोट ठेवत खासदार नारायण राणे यांनी ४० टक्के अखर्चित निधी असल्याचे लक्षात आणून दिले. त्यामुळे अर्थमंत्री अजित पवार यांना मी चांगला ओळखतो.
तुमच्या निधीला निश्चितच कट लागणाऱ, असे त्यांनी सांगितले होते. त्याकडे दुर्लक्ष करीत सत्ताधाऱ्यांनी सभागृहात केवळ वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. नियोजनच्या सभेत वैभव नाईक जोरजोराने ओरडून आपण अभ्यासू असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करीत होते. ते या निधीच्या आकडेवारीवरून सपशेल तोंडावर पडले आहेत़.सभागृहात बोलताना पालकमंत्र्यांनी २४० कोटी रुपयेच आणले जातील, असे आश्वासित केले होते़ मात्र, शेवटी अर्थमंत्र्यांनी या शिवसेनेच्या नेत्यांची कुवत ओळखून निधी दिला आहे. जे गेल्यावर्षीचा निधी १०० टक्के खर्च करू शकत नाहीत ते २४० कोटी कुठल्या तोंडाने मागतात? असा प्रश्न अर्थमंत्र्यांनी विचारला. या अपशयाला शिवसेना जबाबदार असल्याचा टोला आमदार राणे यांनी यावेळी लगावला.नारायण राणे पालकमंत्री असताना सातत्याने जिल्हा नियोजनचा आराखडा वाढत गेला. मात्र, उदय सामंत यांच्या सुरुवातीलाच जिल्हा नियोजनचा आराखडा ५० टक्के कपात झाला़ हे सिंधुदुर्गचे मोठे नुकसान आहे. याची जाणीव जनतेला झाली आहे.
शेतकरी व मच्छिमारांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. फसव्या कर्जमाफीमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. या निधीच्या कमतरतेमुळे संपूर्ण व्यवसाय व आर्थिक उलाढालीवर परिणाम होणार असल्याने जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसेल, अशी भीती आमदार राणे यांनी यावेळी व्यक्त केली़