मालवण : शिवसेनेने नेहमीच पारंपरिक मच्छिमारांच्या ‘पर्ससीन’ विरोधी संघर्षात त्यांच्या बाजूने आपली भूमिका व पाठिंबा दर्शविला आहे. सत्तेतील भाजप-शिवसेना सरकारही पारंपरिक मच्छिमारांच्या बाजूने आहे. मत्स्योद्योग मंत्री एकनाथ खडसे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्ससीन-पारंपरिक वादावर तोडगा काढण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावून हे अधोरेखित केले. दसऱ्यापूर्वी ही बैठक होईल. यात पारंपरिक मच्छिमारांची भूमिका मांडण्यासाठी त्यांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करून शिवसेनाही पारंपरिक मच्छिमारांच्या पाठीशी कायमच खंबीर राहील, असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला. मालवण शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार नाईक म्हणाले, छोट्या मच्छिमारांच्या लढ्यात जिल्ह्यातील शिवसेना नेहमीच पाठिंबा देत राहिली आहे. खासदार विनायक राऊत व पालकमंत्री दीपक केसरकर यांचीही भूमिका मच्छिमारांच्या बाजूने आहे. शासनाने स्वीकारलेल्या डॉ. सोमवंशी अहवालातील तरतुदी कायद्यात अंमलात आणण्यासाठी हिवाळी अधिवेशनात भाजप-सेनेचे आमदार योग्य भूमिका घेतील. कोकण किनारपट्टीवरील हा संघर्ष वाढल्याने शिवसेनेचे आमदार, खासदार व मंत्री एकत्रित भूमिका घेत शिवसेना पक्षप्रमुखांशी भेट घेत पारंपरिक मच्छिमारांविषयी शिवसेना जाहीर भूमिका स्पष्ट करेल, असे नाईक यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)वीजप्रश्नी लवकरच बैठक मालवण शहरासह तालुक्यात विजेच्या अनेक समस्या आहेत. या सोडविण्यासाठी वीज अधिकारी, लोकप्रतिनिधी, नागरिक यांची संयुक्त बैठक लवकर शहरात घेतली जाईल. मालवण शहर विकास आराखड्याबाबत आरोप-प्रत्यारोपांपेक्षा सर्वांनी एकत्र येवून योग्य भूमिका घ्यावी. आराखड्यातील अन्यायकारक बाबी दूर करण्यसाठी आमचाही शासन स्तरावर पाठपुरावा सुरु आहे. याला पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी पाठिंबा द्यावा. भुयारी गटार योजनेच्या रखडलेल्या निधीबाबत आम्ही पाठपुरावा करूच मात्र सत्ताधारी नगरसेवकांनी याबाबत कोणत्याही स्वरुपात मागणी अथवा भेट घेवून याबबत कोणतीही माहिती दिलेली नाही. राजकारण बाजूला ठेवून नागरिकांना न्याय देण्यासाठी आपण शासन स्तरावर पाठपुरावा करू, असे वैभव नाईक यांनी सांगितले.
शिवसेना मच्छिमारांच्या पाठीशी खंबीर
By admin | Published: October 16, 2015 9:15 PM