कणकवली: शून्य शिक्षकी शाळांवर तातडीने शिक्षक भरती करा, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे गुरुवारी आंदोलन करण्यात आले. कणकवली पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच आठ दिवसांत शिक्षक भरतीची कार्यवाही करण्याबाबतचे निवेदन गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांना देण्यात आले. शिक्षकांची पदे रिक्त ठेवून जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा घाट राज्य सरकारने आखला आहे,असा आरोप युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केला. तसेच येत्या आठ दिवसात शाळांमध्ये शिक्षक न मिळाल्यास पंचायत समिती कार्यालयात विद्यार्थ्यांना आणून बसविण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय ते पंचायत समिती कार्यालयापर्यंत शिवसैनिक आणि पदाधिकारी यांनी मोर्चा काढला. यावेळी काही विद्यार्थी व पालकही उपस्थित होते. तातडीने डी.एड. उमेदवारांची शिक्षण सेवक म्हणून भरती करा, या मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांना देण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी किशोर गवस उपस्थित होते. कणकवली तालुक्यात तोंडवली, वायंगणी, खारेपाटण, साळिस्ते, शिरवल या ठिकाणाच्या शाळा शून्य शिक्षक आहेत. या शाळांवर तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून शिक्षकसेवक पदे भरण्यात यावीत आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आंदोलनात तालुकाप्रमुख शैलेश भोगले, माजी नगरसेवक रुपेश नार्वेकर, कन्हैया पारकर, शहराध्यक्ष प्रमोद मसुरकर, तेजस राणे, सचिन आचरेकर, माजी जिल्हा परिषद सदस्या स्वरुपा विखाळे, वैदेही गुडेकर, दिव्या साळगावकर, निसार शेख, वैभव मालंडकर, माजी सरपंच धनश्री मेस्त्री, सिद्धेश राणे आदींनी सहभाग घेतला होता.जोरदार घोषणाबाजी!या आंदोलनाच्यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच शाळांमध्ये शिक्षक नसल्याने राज्याच्या शिक्षणमंत्र्यांचा निषेध यावेळी करण्यात आला.