सावंतवाडी : मल्टीस्पेशालिटी रुग्णालय हे सावंतवाडीतच व्हावे, अशी शिवसेनेची इच्छा आहे. त्याला आम्ही कोणीही आणि कधीही विरोध केलेला नाही. परंतु त्यासाठी आवश्यक असलेली जागा ही विनामोबदला मिळणे गरजेचे आहे. अन्यथा त्या रुग्णालयासाठी मंजूर झालेले पैसे अन्य ठिकाणी जाण्याची भीती आहे, अशी भूमिका येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब, विधानसभाप्रमुख विक्रांत सावंत, जिल्हा परिषदेचे गटनेते नागेंद्र परब, तालुकाप्रमुख रुपेश राउळ, उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, शहर अध्यक्ष बाबू कुडतरकर, शब्बीर मणियार, अनारोजीन लोबो, नारायण राणे आदी उपस्थित होते.मल्टीस्पेशालिटी रुग्णालयावरून खासदार विनायक राऊत यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाल्यानंंतर त्यांनी आम्हांला राजघराण्यासह नगराध्यक्ष संजू परब यांना भेटायला सांगितले. त्यानुसार आम्ही ही भेट घेतली. परंतु आपल्याला त्या जागेचा मोबदला हवा, असे राजघराण्याचे म्हणणे आहे.
शहरातील पालिकेची आरक्षित जागा ताब्यात घेण्यासाठी तब्बल २७ कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. त्यामुळे आता याबाबत ३१ जुलैपर्यंत योग्य ती भूमिका घेणे गरजेचे आहे, असे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.याबाबतचा निर्णय एक महिन्याच्या आत व्हावा. त्यासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध करून द्यावी. नाहक कोणी विरोधासाठी विरोध करू नये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारचे रुग्णालय याठिकाणी उभे राहणे गरजेचे आहे. त्यामुळे नाहक राजकारणाचा प्रयत्न झाला तर ते दुर्दैवी आहे, असेही ते म्हणाले.त्यांच्या भूमिकेशी ठामआमदार दीपक केसरकर यांनी शहरातच रुग्णालय उभारणार, अशी भूमिका घेतली होती. याबाबत आमच्यात आणि त्यांच्यात कोणतेही दुमत नाही. त्यांच्या भूमिकेशी आजही आम्ही ठाम आहोत. परंतु या ठिकाणी विनामूल्य जागा न मिळाल्यास रुग्णालय गमवायचे का? असाही सवाल पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.नगराध्यक्ष परब यांनी पालकमंत्र्यांचा पुतळा जाळू, असे विधान केले होते. याबाबत सतीश सावंत यांना विचारले असता, ते म्हणाले, नंतर काय ते बघू. बोलणे सोपे असते, असे सांगत त्यांनी नगराध्यक्षांना चिमटा काढला.पूर्णविराम मिळणे गरजेचेसंबंधित जागेचा आम्हांला मोबदला देण्यात यावा, असे राजघराण्याचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे नगराध्यक्ष परब सांगत असलेली जागा ही पालिकेची असल्यामुळे ती आरक्षित करण्यासाठी २७ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यामुळे हे रुग्णालय उभारण्यावरून निर्माण झालेल्या वादाला पूर्णविराम मिळणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.त्यानुसारच घेतली भेटसावंतवाडीत होणारे रुग्णालय अन्य ठिकाणी नेले जात आहे. असे कारण पुढे करून काही विरोधकांकडून खासदार विनायक राऊत यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, या विषयावरुन निर्माण झालेल्या वादळाच्या पार्श्वभूमीवर खुद्द राऊत यांनी आम्हांला दोघांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे जाणून घेण्यास सांगितले. त्यानुसार आम्ही भेट घेतली.