दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील काही मंडळी विकासाच्या मुद्यावर बोलून तरुणांची माथी भडकविण्याचे काम करीत आहेत. तसेच दोडामार्ग महाराष्ट्र राज्यापासून वेगळा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. असा प्रकार आम्ही कदापि खपवून घेणार नाही. हा त्यांचा प्रयत्न आम्ही शिवसेना हाणून पाडेल, असे शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.धुरी पुढे म्हणाले की, विलिनीकरणाच्या बैठकीत शिवसेनेने हस्तक्षेप केला, याला दादागिरी म्हणता येत नाही. मराठी माणसाचा स्वाभिमान आम्ही दाखविला. दोडामार्ग तालुक्यातील जमिनी गोव्यातील मोठ्या धनदांडग्या मायनिंग कंपनीने खरेदी केलेल्या आहेत. या मायनिंग लॉबी सुरु करण्यासाठी त्या कंपन्या येथील काहींना हाताशी धरून दोडामार्ग गोव्याला जोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण शिवसेना हे कदापि करू देणार नाही.गोव्यातून आलेला पत्रकारसंघ आमचा गोव्यात निषेध करीत आहे. महाराष्ट्र अखंडित रहावा, अशी भावना आमची होती. आमचे म्हणणे गोव्यात तुमच्या माध्यमातून चित्रित करा, असा आमचा हेतू होता. आम्ही कोणत्याही प्रकारची धक्काबुक्की केली नाही की तसा कोणताही प्रयत्न आमच्याकडून झाला नाही.आरोग्य सेवेबाबत भाजप अपयशीनिवडणुकीदरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोव्यातील काही मंत्र्यांना जिल्ह्यात फिरविले. मात्र, ते जिल्ह्यातील नागरिकांना गोव्यात मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी अपयशी ठरले. याबाबत भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना जाब विचारावा. राजकीय पक्षांनी पहिल्यांदा आपली भूमिका स्पष्ट करून महाराष्ट्र फोडावा की नको हे ठरवावे.
येत्या काळात आम्ही आडाळी एमआयडीसीचे काम पूर्ण करून येथील तरुणांना तेथे रोजगार देण्याचा प्रयत्न करू. तसेच तालुक्यातील रस्तेही सुधारू, असे आश्वासन त्यांनी दिले. पण तरुणांची माती भडकवून जर दोडामार्ग तालुका गोव्याला जोडण्याचा प्रयत्न झाल्यास तो हाणून पाडू, असे धुरी म्हणाले.