दापोली : ‘दीपावली सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ म्हणत फटाक्यांची मनमुराद आतषबाजी करून ध्वनी आणि वायू प्रदूषण वाढवणाऱ्या सुशिक्षित नागरिकांना दापोली शहरातील शिवचैतन्य मार्ग येथील बच्चे कंपनीने या दीपावलीत स्वत: फटाके न वाजवता चांगलेच ‘बाळकडू’ पाजले असल्याची सर्वत्र चर्चा आहे.खेड तालुक्यातील तिसंगी येथील चिमुरड्याचा फटाक्याची दारू खाल्ल्याने मृत्यू झाल्याची घटना या बच्चेकंपनीच्या कानावर आली. त्याचप्रमाणे शाळेमध्ये फटाक्यांनी होणाऱ्या प्रदूषणाबाबत करण्यात आलेल्या मार्गदर्शनानंतर सिध्देश बागडे आणि आदित्य गवळी या दोस्तांनी आपल्या सभोवतालच्या बालमित्रांना एकत्रित करून फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला. फटाकेमुक्त दीपावलीच्या संकल्पात सिध्देश बागडे, आदित्य गवळी, अथर्व जाधव, साहील पाटील, ओम बागडे, आसावरी गवळी, आर्यन पाटील, प्रयाग भांबुरे, सानसी बागडे, अनुष्का गवळी, दीप भांबुरे, अब्दुल मुतालिफ, पायल बागडे, सार्थक वर्मा यांनी हा संकल्प पूर्ण केला. (प्रतिनिधी)
शिवचैतन्य मार्गावर फटाकेमुक्तीचे ‘बाळकडू’
By admin | Published: November 16, 2015 9:31 PM