माणगाव : माणगाव खोऱ्यातील शिवापूर गावाला खासदार विनायक राऊत यांनी भेट दिली. शिवापूर गावातील नैसर्गिक साधनसंपत्ती पाहून या गावाच्या सर्वांगिण विकासाकरिता राऊत यांनी शिवापूर गाव दत्तक घेतले आहे. ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या स्वागत समारंभात त्यांनी याबाबतची माहिती दिली. शिवापूर गावभेटीच्यावेळी खासदार राऊत यांचे कोठीवाडी व हरिजनवाडीतील ग्रामस्थांनी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीने स्वागत केले. शिवापूर गावात जाताना खासदारांनी येथील रस्त्यांची दुर्दशा अनुभवली. येथील नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोतांचा वापर करून नळपाणी योजना राबविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. प्रधानमंत्र्यांनी स्वातंत्र्यदिनी प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घेऊन विकासाचे मॉडेल बनवा, असे आवाहन केले होते. शिवापूर येथील नैसर्गिक साधन संपत्ती व विकासातील वाव पाहून खासदार राऊत यांनी शिवापूर हे जिल्ह्यात विकासाचे मॉडेल बनविणार असल्याचे सांगितले. निसर्गाचे वरदान लाभलेले व शिवकालीन मनोहर मनसंतोषगड असलेले, कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले शिवापूर पर्यटनदृष्ट्या विकसित होईल, अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली. खासदारांनी माणगाव खोऱ्यातील मोरे, वसोली, हळदीचे नेरूर, शिवापूर या गावांना भेट दिली. येथील ग्रामस्थांकडून गावातील समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक, अभय शिरसाट, राजन नाईक, रमाकांत तामाणेकर, स्रेहा परब, राजू कविटकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. खासदारांनी शिवापूर गाव दत्तक घेऊन विकासाचे मॉडेल बनविणार, असे सांगितल्याने ग्रामस्थांच्या विकासाबाबतच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. याबद्दल ग्रामस्थांनी खासदारांचे आभार मानले. (प्रतिनिधी)
शिवापूर गाव खासदारांनी घेतले दत्तक
By admin | Published: August 31, 2014 12:35 AM