Narayan Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्यांना काल दुपारी अटक करण्यात आली. त्यानंतर रात्री उशीरा त्यांना महाड कोर्टाकडून जामीनही मिळाला. त्यानंतर रत्नागिरी-सिंधुदुर्गचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी आज सकाळी पुन्हा एकदा राणेंवर हल्लाबोल केला आहे. राणेंना जामीन मिळाला असला तरी ते आता राज्यात ज्या ज्या ठिकाणी जातील तिथं भाजपचा पराभव निश्चित आहे, हे भाजपनं ओळखावं, असं विनायक राऊत म्हणाले.
'फडणवीसांना कायद्याचं चांगलं ज्ञान, पण मी माझ्या आदेशावर ठाम'; नाशिक पोलीस आयुक्त स्पष्टच बोलले!
राणेंच्या आक्षेपार्ह विधानावरुन विनायक राऊत यांनी काल दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून राणेंना मंत्रिपदावरुन हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आज विनायक राऊत सिंधुदुर्गात त्यांच्या घरी पोहोचले. काल रात्री राऊत यांच्या बंगल्यावर अज्ञातांनी काचेच्या बाटल्या फेकल्याचीही घटना उघडकीस आली होती. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
शाब्बास! राणेंच्या बंगल्याबाहेर आंदोलन करणाऱ्या युवासैनिकांना उद्धव ठाकरेंची शाबासकी
राणेंच्या अटकेबाबत बोलताना राऊत यांनी पुन्हा एकदा राणे कुटुंबीयांवर हल्ला केला. "राणेंना झालेली अटक आणि त्यानंतर मिळालेला जामीन हे सर्वकाही कायदेशीररित्याच झालं आहे. केंद्रीय मंत्रिपदी विराजमान असताना असली बेफाम वक्तव्य करुन चालत नाही. तुम्ही काही कायद्यापेक्षा मोठे नाही. त्यामुळे यापुढे ते काळजी घेतील अशी आशा आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश असलेल्या कॅबिनेट मंत्र्यानं अशाप्रकारचं वक्तव्य करणं हे दुर्दैवीच होतं. त्यांना जामीन मिळालेला असला तरी राज्यात आता ते जिथं जिथं जातील, यात्रा करतील त्या सर्व ठिकाणी भाजपचा पराभव होईल, हे भाजपनं आताच ओळखावं", असं विनायक राऊत म्हणाले.