रत्नागिरी : जानेवारी ते जून २०१६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील शिरगावसह तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत सभागृहात आज मतमोजणी झाली. प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या ग्रामपंचायतीवर शिवसेनेने केवळ एक जागा गमावून वर्चस्व प्रस्थापित केले असले तरी दोन वेळा सरपंचपद भूषविणाऱ्या रज्जाक काझी यांना पराभवाला सामोरे जावे लागले.जानेवारी ते जून २०१६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव, फणसोप आणि पोमेंडीबुद्रुक या तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी मतदान झाले. त्याची सोमवारी मतमोजणी झाली. शिरगाव ग्रामपंचायतीत ६ प्रभागात १७ जागांसाठी तब्बल ४९ उमेदवार उभे होते. या सर्व जागांवर शिवसेना पुरस्कृत उमेदवार उभे होते. पहिल्या प्रभागातील उमेदवारांबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. यात सरपंच रज्जाक काझी, त्यांची पत्नी फरिदा काझी, अलीमिया काझी यांची पत्नी रहिमत काझी यांचा समावेश असल्याने कुणाला किती मते मिळणार, याबाबत साऱ्यानांच उत्सुकता होती. मात्र, या ग्रामपंचायतींच्या सहा प्रभागातील १७ जागांपैकी १६ जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. मात्र, सरपंच रज्जाक काझी यांना पराभव स्वीकारावा लागला. सविस्तर निकाल असा : प्रभाग १, एकूण जागा ३ : सर्वसाधारण प्रवर्ग (२) : उझेर काझी, अल्ताफ संगमेश्वरी. सर्वसाधारण स्त्री (१) रहिमत अलिमिया काझी.प्रभाग २, एकूण जागा २ : नामाप्र स्त्री (१): फरीदा रज्जाक काझी, सर्वसाधारण स्त्री (१) शाहीन मुजावर. प्रभाग ३, एकूण जागा ३ : नामाप्र (१) : सचिन सुरेश सनगरे. नामाप्र स्त्री (१) विश्वकला विलास लाड. सर्वसाधारण स्त्री (१) चित्रा राजकिरण दळी. प्रभाग ४, एकूण जागा ३ : नामाप्र (१) : समीर खाडे. सर्वसाधारण (१) विशाल शिंदे. सर्वसाधारण स्त्री (१) समीक्षा शिंदे.प्रभाग ५, एकूण जागा ३ : सर्वसाधारण (२) : प्रभाकर पालकर, प्रल्हाद शेट्ये. सर्वसाधारण स्त्री (१) श्रद्धा मोरे.प्रभाग ६, एकूण जागा ३ : सर्वसाधारण (१) : प्रभाकर पायरे. नामाप्र स्त्री (१) वैशाली गावडे. सर्वसाधारण स्त्री (१) स्नेहल कदम.शिरगावचे सरपंचपद यावेळी सर्वसाधारण स्त्रीसाठी राखीव आहे. यासाठी श्रद्धा मोरे आणि रहिमत काझी या दावेदार असल्या तरी श्रद्धा मोरे यांच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडणार असल्याचे राजकीय क्षेत्रातून बोलले जात आहे. (प्रतिनिधी)
शिरगावात शिवसेना पुरस्कृत आघाडी
By admin | Published: December 22, 2015 1:10 AM