कोकणवासीयांसाठी मोठा दिवस असून, सिंधुदुर्गच्या चिपी परुळे येथील विमानतळाचा शुभारंभ होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे दोघेही या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. सिंधुदुर्गात जवळपास एक दशकापासून चिपी विमानतळाचे काम सुरू होते. नारायण राणे काँग्रेसमध्ये मंत्री असताना या विमानतळाचे काम सुरु करण्यात आले होते. भूमीपूजन झाल्यानंतर मध्यंतरीच्या काळात हे काम रेंगाळले होते. त्यानंतर शिवसेनेच्या काळात हे काम पूर्णत्वास गेले. यामुळे विमानतळाचा विकास कोणी केला यावरून नारायण राणे आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये श्रेयवाद सुरू होता. याच दरम्यान आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
विनायक राऊत (Shivsena Vinayak Raut) यांनी "काचेच्या घरात राहणाऱ्यांनी, भ्रष्टाचाराच्या चिखलात बुडालेल्यांनी इतरांवर आरोप करण्याचं धाडसच करू नये" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. राणेंना (Narayan Rane) सणसणीत टोला लगावला आहे. तसेच पोस्टरबाजीवरूनही टीका केली आहे. "स्वत: काचेच्या घरात राहणाऱ्यांनी, भ्रष्टाचाराच्या चिखलात बुडालेल्यांनी इतरांवर आरोप करण्याचं धाडसच करू नये. शिवसेनेनं गेल्या दोन वर्षांत ज्या पद्धतीने सिंधुदुर्गात काम केलंय, ते पाहाता आम्ही केव्हाही पंचनामा करायला तयार आहोत. आम्हाला घाबरण्याचं कारण नाही" असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.
"शिवसेनेला पोस्टरबाजी करण्याची गरज नाही"
नारायण राणेंनी शिवसेनेकडून आणि विशेषत: विनायक राऊत यांनी केलेल्या पोस्टरबाजीवर निशाणा साधला होता. त्याविषयी बोलताना राऊत यांनी "प्रामाणिकपणे लोकप्रतिनिधीची भूमिका बजावणाऱ्या आमच्यासारख्या सर्वांनाच आजचा दिवस आनंदाचा आहे. शिवसेनेला पोस्टरबाजी करण्याची गरज नाही. 1999 साली विमानतळाची सुरुवात झाली. 2003 साली पहिलं आणि 2009 साली दुसरं भूमिपूजन झालं. त्यांनी भूमिपूजन करण्याचं काम अनेकदा केलं. पण खऱ्या अर्थाने विमानतळाच्या कामाला सुरुवात 2016 पासून झाली" असं विनायक राऊत म्हणाले. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.
आज चिपी विमानतळाचे उद्घाटन; उद्धव ठाकरे-नारायण राणे एकाच व्यासपीठावर
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी येथे बांधण्यात आलेल्या विमानतळाचे काम पूर्ण झाल्याने विमानाने गावी जाण्याचे चाकरमान्यांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. आज दुपारी एक वाजता हा लोकार्पण सोहळा होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे गेल्या महिन्यातील वादंगानंतर पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार आहेत. केंद्रीय विमान वाहतूक उड्डान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्मंत्री अजित पवार, शिवसेना नेते सुभाष देसाई, विनायक राऊत, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, परिवहनमंत्री अनिल परब उपस्थित राहणार आहेत.