सावंतवाडी/तळवडे/बांदा : सावंतवाडी तालुक्यात एप्रिल महिन्यात झालेल्या दहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सात ग्रामपंचायतींवर शिवसेना तर दोन ग्रामपंचायतींवर काँग्रेसने वर्चस्व ठेवले आहे. आरोंद्यात मात्र गाव विकास पॅनेल की शिवसेना यात संभ्रम निर्माण झाला आहे.सावंतवाडी तालुक्यात एप्रिल महिन्यात दहा ग्रामपंचायतीसाठी निवडणूक झाली होती. यावेळी इन्सुली, आरोंदा या ग्रामपंचायतींबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, तब्बल तीन महिन्यांनंतर तालुक्यातील राजकारणाचे चित्र पलटून गेले असून इन्सुलीमध्ये विद्यमान सभापती गुरुनाथ पेडणेकर तसेच माजी तालुकाध्यक्ष बाळा गावडे यांना धुळ चारत शिवसेनेने सरपंचपदी उत्कर्षा हळदणकर, तर उपसरपंचपदी कृष्णा सावंत यांना बसवले. तर डिंगणेमध्ये सरपंचपदी कॉंग्रेसचे स्मिता नारायण नाईक व उपसरपंचपदी रोहित नाडकर्णी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.मळेवाडमध्ये गाव विकास पॅनेल असले, तरी शिवसेनेचे या ग्रामपंचायतीवर वर्चस्व असून सरपंचपदी सुप्रिया कुंभार, तर उपसरपंचपदी नंदू नाईक यांची निवड करण्यात आली. मळगाव येथेही अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचे गणेशप्रसाद पेडणेकर, तर उपसरपंचपदी देवयानी राऊळ यांची निवड करण्यात आली आहे. तळवडे येथे काँग्रेसने वर्चस्व राखले असून, या ठिकाणी सरपंचपदासाठी काँग्रेस अंतर्गत मोठी चुरस होती. यात सरपंचपदी पंकज पेडणेकर यांनी बाजी मारली. तर उपसरपंचपदी नम्रता गावडे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.दरम्यान, कोलगाव येथे शिवसेनेने आपले वर्चस्व राखले असले, तरी ही ग्रामपंचायत उपसभापती महेश सारंग यांच्या ताब्यातून हिसकावून घेतल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले होते. सर्व कार्यकर्त्यांनी भगवे फेटे बांधत ग्रामपंचायतमध्ये प्रवेश केला. यावेळी सर्वांच्यामते सरपंचपदी रश्मी काजरेकर, तर उपसरपंचपदी कोलगावातील सर्वेेसर्वा फ्रान्सिस डिसोझा यांची निवड झाली आहे. आंबोलीत सरपंचपदी शिवसेनेच्या लिना राऊत यांनी बाजी मारली. तर उपसरपंचपदी विलास गावडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. आरोस सरपंचपदी शिवसेनेचे साक्षी नाईक, तर उपसरपंचपदी दत्तगुरू दळवी यांची बिनविरोध निवड झाली आहे. या ग्रामपंचायतीवर पूर्वीपासून पालकमंत्री दीपक केसरकर समर्थकांचे वर्चस्व होेते. तर दांडेलीत शिवसेनेच्याच चित्रा गोडकर यांची सरपंचपदी, तर उपसरपंचपदी महादेव पांगम यांची निवड झाली आहे.आरोंद्यात मात्र गाव विकास पॅनेल की शिवसेना यात संभ्रम कायम आसहे. आरोंद्यात गाव पॅनेलने निवडणुकीत बाजी मारली होती. पण सरपंचपदाच्या निवडणुकीवेळी चक्क शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी उमा बुडे यांची निवड होताच त्यांना पुष्पहार अर्पण केला. तर उपसरपंचपदी अशोक नाईक यांची निवड करण्यात आली आहे. मात्र, गावातील अनेकांनी गाव विकास पॅनेलचाच सरपंच व उपसरपंच असल्याचा दावा केला आहे.सात ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे सरपंच, उपसरपंच विराजमान झाल्यानंतर सायंकाळी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते नूतन सरपंच, उपसरपंचांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अशोक दळवी, फ्रान्सिस डिसोजा आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) वादंगानंतर तळवडेत सरपंच विराजमानतळवडे ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसची सत्ता आली खरी; पण सरपंचपदावरून वादंग सुरू होता. या सरपंच व उपसरपंचपदासाठी कार्यकर्त्यांची बैठक सकाळी सिध्देश्वर मंदिरात घेण्यात आली. त्यानंतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी समजूत घातल्यानंतर हा वाद अखेर मिटला. यावेळी तालुकाध्यक्ष संजू परब, सभापती प्रमोद सावंत, गुरू पेडणेकर, प्रियांका गावडे, आनंदी परब, सुप्रिया कुं भार, बाळू साळगावकर, सुनंदा मयेकर, रवींद्र परब, प्रमोद गावडे, काँग्रेस विभागीय अध्यक्ष बाळू साळगावकर, विद्याधर परब, नवसाजी परब, मंगलदास पेडणेकर, ज्ञानेश्वर गोडकर, विजय रेडकर आदी उपस्थित होते.इन्सुलीत नाट्यमय घडामोडीत शिवसेनेची बाजीइन्सुली ग्रामपंचायतीत नाट्यमय घडामोडीनंतर सरपंच व उपसरपंच निवडणुकीत शिवसेनेच्या उत्कर्षा हळदणकर व कृष्णा सावंत यांची निवड झाली. या निवडीमुळे विद्यमान जिल्हा परिषद सभापती गुरू पेडणेकर व माजी तालुकाध्यक्ष बाळा गावडे यांना चांगलाच धक्का बसला आहे. निवडणूक झाल्यानंतर ही ग्रामपंचायत कोणाकडे जाणार, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. ती उत्सूकता या निवडीमुळे संपली आहे.
सावंतवाडीत सात ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा झेंडा
By admin | Published: August 03, 2015 11:49 PM