मालवण : मत्स्य विभागाने रविवारी सायंकाळी मलपी-कर्नाटक येथील हायस्पीड नौका अनधिकृत मासेमारी करत असताना पकडली. मात्र त्या नौकेवर कारवाई करण्याची कार्यवाही प्रक्रिया पूर्ण झाली नसताना त्या नौकेने पलायन केले. मालवण बंदरात झालेला हा प्रकार संशयाच्या भोवऱ्यात आहे. मत्स्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांनीच हायस्पीड नौका पळवून लावली, असा गंभीर आरोप मालवणातील मच्छिमारांनी केला.यावेळी शिवसेना पक्षाच्या नेतृत्वाखाली मच्छिमारांनी मत्स्य आयुक्त राजकुमार महाडिक यांना तब्बल दोन तास फैलावर घेत जाब विचारला. दरम्यान, मालवण बंदरातून पलायन केलेल्या नौकेच्या घटनेची चौकशी करून संबंधित अधिकाºयांवर निलंबनाची कारवाई करावी. तसेच लाखो रूपयांच्या मासळीसह हायस्पीड नौका पळवून नेल्याप्रकरणी नौका मालकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मच्छिमार नेते तथा शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केली.सिंधुदुर्गच्या सागरी हद्दीत घुसखोरी केलेल्या मलपी येथील एक हायस्पीड मासेमारी नौका रविवारी सायंकाळी मत्स्य विभागाच्या गस्ती नौकेने पकडली. त्या नौकेवर लाखो रुपये किमतीची मासळीही सापडून आली होती. त्यामुळे पुढील कार्यवाही करण्यासाठी रविवारी रात्री खलाशी व तांडेल यांच्यासह मत्स्य अधिकाºयांच्या देखरेखीखाली मालवण बंदरात ठेवण्यात आला होता. असे असताना त्या हायस्पीड नौकेने रातोरात पलायन केले.त्या पार्श्वभूमीवर मालवणातील मच्छिमार संतप्त बनले. हरी खोबरेकर यांच्या नेतृत्वाखाली मत्स्य कार्यालयात धडक देत सहाय्यक मत्स्य आयुक्त राजकुमार महाडिक यांना धारेवर धरले. अधिकाºयांच्या भ्रष्ट कारभारामुळे परराज्यातील बोटी मासळीची लूट करत असल्याचा आरोपही केला. यावेळी बाबी जोगी, विकी तोरसकर, छोटू सावजी, भाऊ मोरजे, संतोष देसाई, बाबू आचरेकर, संमेश परब यांच्यासह दांडी, वायरी, धुरीवाडा येथील मच्छिमार उपस्थित होते.प्रदीप वस्त यांचे अपहरणमालवण बंदरातून रविवारी रात्री हायस्पीड नौका पळाली. त्यावेळी त्या नौकेवर कारवाई करण्यासाठी मत्स्य अधिकारी प्रदीप वस्त उपस्थित होते. मात्र त्यानंतर वस्त हे मंगळवार सकाळपर्यंत बेपत्ता होते. त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नसल्याने मच्छिमारांनी वस्त यांचे अपहरण झाले असावे, त्यामुळे त्यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली. मात्र मंगळवारी दुपारी उशिरा प्रदीप वस्त मत्स्य कार्यालयात उपस्थित झाले.मनसेचाही दणकाहायस्पीड नौकेने पलायन केल्याप्रकरणी मनसे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनीही सहाय्यक मत्स्य आयुक्त यांना जाब विचारत नौका मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव, शैलेश अंधारी, विल्सन गिरकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते
नौका पलायनप्रकरणी शिवसैनिक आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 10:57 PM