कणकवली : बांधकाम व्यावसायिक उदय लवू पवार यांच्या कणकवली सोनगेवाडी येथील कृपासावली या बंगल्याला शॉर्ट सर्किटने आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना आज, बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. सुदैवाने घरातील कोणालाही दुखापत झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह नगरपंचायतच्या अग्निशामक बंबासह घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. आगीत उदय पवार यांच्या कार्यालयामधील सर्व महत्वाची कागदपत्रे, फर्निचर जळून खाक झाले. उदय पवार यांचा सोनगेवाडी येथे दुमजली बंगला आहे. आज, पहाटेच्या सुमारास शॉर्ट सर्किटने त्यांच्या बंगल्यातील तळमजल्यावरील कार्यालयाला आग लागली. त्यानंतर ही आग पसरत हॉलमध्ये आली. उदय पवार व त्यांचे वडील लवू पवार हे पहिल्या मजल्यावर बेडरूममध्ये झोपले होते. आगीमुळे तळमजल्यावरील जळत असलेल्या फर्निचर व अन्य साहित्याच्या आवाजामुळे तसेच धुरामुळे त्यांना जाग आली. स्थानिक नागरिकांनी घरातील पाण्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचा भडका मोठा असल्यामुळे आग आटोक्यात येत नव्हती. सामाजिक कार्यकर्ते निखिल आचरेकर यांनी तत्काळ माजी नगराध्यक्ष समीर नलावडे याना घटनेची कल्पना देताच त्यांनी कणकवली नगरपंचायतच्या अग्निशामक बंबासह घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. आगीमुळे पहिल्या मजल्यावर अडकलेल्या लवू पवार व उदय पवार यांना शिडीच्या सहाय्याने खाली उतरविण्यात आले. पोलिस हवालदार चंद्रकांत झोरे यांनी घटनास्थळी दाखल होत प्राथमिक पंचनामा केला.