कणकवली : कणकवलीसहसिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारी भारत बंदला अल्प प्रतिसाद मिळाला . एसटी , तीन व सहा आसनी रिक्षा वाहतुकीबरोबर जिल्ह्यातील बाजारपेठाही सुरू होत्या . दरम्यान , व्यापारी संघटनेने या भारत बंदला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी काळ्या फिती लावून आपला व्यवसाय सुरू ठेवला होता . तर मंगळवारी कणकवलीचा आठवडा बाजाराचा 'दिवस' असल्याने बाजारात दैनंदिन लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी मोठी गर्दी होती .देशात शेतकऱ्यांचे आंदोलन पेटले आहे . या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात कणकवलीसह सर्वच बाजारपेठांमध्ये बंदला अल्प प्रतिसाद मिळाला आहे . कणकवली बाजारपेठ नेहमीप्रमाणे सुरू होती . मात्र व्यापाऱ्यांनी काळ्या फिती लावून व्यवसाय चालू ठेवला होता .विविध पक्षांनी नवीन शेतकरी कायद्याच्या विरोधात मंगळवारी "भारत बंद"ची हाक देशवासीयांना दिली होती. मात्र , सिंधुदुर्गासह पर्यटन जिल्ह्याचे ऐतिहासिक प्रवेशद्वार ठरलेल्या फोंडाघाट मध्ये व्यापाऱ्यांनी "भारत बंद" नाकारल्याने बाजारपेठ नेहमीप्रमाणे उत्साहात सुरू होती. त्यामुळे नाक्या-नाक्यावर उलट-सुलट चर्चांना ऊत आला होता . सिंधुदुर्ग भारतात येत नाही का ? येथ पासून हा कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा कसा आहे ? यावर समर्थक आणि विरोधकांच्या रंगलेल्या गप्पा हा इतर नागरिकांसाठी कुतूहलाचा विषय होता.बाजारपेठेतील व्यापारी दुकाने, बँका,पोस्ट,एस् .टी, शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू होती. तीन आसनी व सहा आसनी रिक्षा यांची वर्दळ नेहमीप्रमाणे सुरू होती.ओरोस येथील मुख्य चौकात रोजच्या प्रमाणे सर्व हॉटेल्स तसेच इतर दुकाने सुरू होती. शिरगांवसह देवगड तालुक्यातील बाजारपेठेत नेहमीप्रमाणे ग्राहकांची वर्दळ, सर्व व्यापारी अस्थापने, दुकाने सुरू होती . दूध,भाजीपाला मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने बंदचा कोणताही परिणाम जाणवला नाही. जनजीवनही सुरळीत होते. तर एसटी सेवाही नेहमीप्रमाणे सुरू होती.या भारत बंद आंदोलनाला मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटना, जलक्रीडा व्यावसायिक, श्रमिक मच्छीमार संघाने आपला पाठींबा दर्शविला होता.त्यामुळे सिंधुदुर्ग किल्ला दर्शन, जलक्रीडा प्रकार बंद ठेवण्यात आले होते . मात्र, मालवणात पर्यटकही मोठ्या संख्येने दाखल झाले होते. त्यांना किल्ले दर्शन व जलक्रीडा प्रकारांचा आनंद लुटता न आल्याने त्यांचा काहीसा हिरमोड झाला आहे. अनेक पर्यटकानी बंदरजेटी येथून किल्ले सिंधुदुर्गला अभिवादन केले.भारत बंदचा मालवण बाजारपेठेवर कोणताही परिणाम जाणवला नाही. बाजारपेठ गजबजलेली दिसून येत होती. पोलीस प्रशासनानेही प्रमुख नाक्यांवर चोख बंदोबस्त ठेवला होता. नांदगाव, तळेरे, खारेपाटण मध्ये भारत बंदचा कोणताही परिणाम जाणवला नाही. सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. कसाल , कुडाळ , सावंतवाडी , वेंगुर्ला, दोडामार्ग ,वैभववाडी बाजारपेठ येथे नेहमीप्रमाणे सर्व दुकाने सुरु होती. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी बंदला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.प्रबळ शेतकरी संघटना कार्यरत नाही !काही राजकीय पक्ष प्रणित शेतकरी संघटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असल्या तरी त्यांचा म्हणावा तसा प्रभाव जाणवत नाही. त्यामुळे प्रबळ शेतकरी संघटना कार्यरत नसल्याने भारत बंदचा परिणाम जिल्ह्यात जाणवला नाही.कणकवलीत भाजपाकडून कांदे विक्री !भारत बंदच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी भाजपाच्यावतीने कणकवलीत ३० रुपये किलो दराने कांदे विक्री करण्यात आली. सध्या बाजारात ६० ते ७० रुपये किलो दराने कांदे विक्री सुरू असताना स्वस्त दराने कांदे मिळत असल्याने खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. शेतकरी आपला माल देशभर कुठेही विकू शकतो . हे या कांदे विक्रीतून आम्ही दाखवून दिल्याचे भाजप नेते माजी आमदार प्रमोद जठार यांनी यावेळी सांगितले.