वैभव साळकर-- दोडामार्ग --एकिकडे राज्यभरात दुष्काळामुळे पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली असताना दोडामार्ग तालुक्यातील जनता तिलारीधरणाच्या मुबलक पाणी साठ्यामुळे पाणी टंचाईच्या समस्येपासून दूर आहे. गोवा आणि महाराष्ट्र राज्याच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या या प्रकल्पामुळे गेल्या पाच वर्षांपासून तालुक्यात पाणी टंचाईची समस्या नगण्य बनली आहे. विहिरींंच्या पाण्याची पातळी व भूगर्भातील जलसाठ्याचे प्रमाण तिलारीच्या कालव्यातून प्रवाहीत होणाऱ्या पाण्यामुळे वाढल्याने तालुकावासीयांसाठी तिलारी धरण वरदान ठरले आहे.सध्या संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळामुळे होरपळत आहे. चालू वर्षी पाऊस कमी प्रमाणात झाल्याने मराठवाडा, विदर्भ आदी भागातील लोकांवर पाणी- पाणी करण्याची वेळ आली आहे. त्या तुलनेत कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याची आणि पर्यायाने दोडामार्ग तालुक्याची परिस्थिती समाधानकारक आहे. तालुक्यात साकारलेले तिलारी धरण पाणी टंचाईवर मात करण्यासाठी एक रामबाण उपाय ठरले आहे. साधारणत: पाच वर्षांपूर्वी तालुक्याची परिस्थिती पाण्याच्या बाबतीत फारच चिंताजनक होती. भेकुर्ली, तळकट, पिकुळे, बोडदे, उसप, कुंब्रल आदी भागास पाणीटंचाईला दरवर्षी सामोरे जावे लागले. त्यामुळे पाणीटंचाईचे दुखणे दरवर्षी मार्चनंतर सुरू व्हायचे. परंतु तिलारी धरणाचे कालवे प्रवाहीत झाले आणि तेव्हापासून पाणीटंचाईची ही समस्या खूपच कमी झाली. गेल्या पाच वर्षात तिलारीच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे पाणी टंचाईची समस्या दूर होण्यास मदत झाली आहे.तिलारी प्रकल्प एक प्रकारे तालुकावासीयांसाठी वरदान ठरला आहे. १६ टीएमसी एवढा पाणीसाठा दरवर्षी धरणात केला जातो आणि त्यानंतर हे पाणी डावा आणि उजवा अशा दोन्ही कालव्यांद्वारे गोव्यात सोडले जाते. त्यापैकी डावा कालवा हा कोनाळकट्टा, साटेली भेडशी, कुडासे, आंबेली, कसई- दोडामार्ग येथून गोव्यात जातो. तर उजवा कालवा घोटगेवाडी, घोटगे, परमे, कुडासे, सासोली मार्गे गोव्यातील पेडणे तालुक्यात प्रवेश करतो. साहजिकच हे दोन्ही कालवे तालुक्यातील निम्मी गावे व्यापतात. साधारणत: आॅक्टोबर अखेरनंतर दोन्ही कालव्यातून गोव्याला पाणी सोडले जाते. ते पुढे जूनपर्यंत तरी कायम असते. परिणामत: पाण्याचा प्रवाह चालूच असल्याने कालव्यालगतच्या विहिरी, नाले, ओढे, ओहोळ आदींना पाणी असते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच गुरांसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्नही सुटतो.टंचाई आराखडा नावापुरतातिलारी धरणामुळे तालुक्यात पाणीटंचाईचे टेन्शन नसले, तरी काही ठिकाणी मात्र त्याला अपवाद आहे. मांगेली- देऊळवाडी, तळेखोल-वाटुळवाडी, तेरवण- मेढे या ठिकाणी मात्र भूगर्भातील पाणीसाठा कमी झाल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. दरवर्षी प्रशासन टंचाई आराखडा बनविते. मात्र, त्याची अंमलबजावणी उशिराने होत असल्याने त्याचा नाहक त्रास तेथील लोकांना सहन करावा लागतो. प्रशासनाची डोकेदुखी कमीएकंदरीत तिलारीच्या कालव्यामुळे पाणीटंचाईवर मात करणे सहज सुलभ बनले असल्याने प्रशासनाची डोकेदुखीही कमी झाली आहे.
दोडामार्गात टंचाईची समस्या नगण्य
By admin | Published: April 26, 2016 11:17 PM