कणकवली : संदेश पारकर यांनी कणकवलीतील क्रीडांगणासाठी ४ कोटींचा निधी आणल्याचे जाहीर केले आहे. त्यात तथ्य असेल तर त्यांनी त्या कामाची प्रशासकीय मान्यता दाखवावी अन्यथा राजकारणातून निवृत्ती घ्यावी . असे आव्हान उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी आज दिले.तसेच नगरपंचायतीच्या ताब्यात अजूनही जागा आली नसताना १ कोटी रुपये खर्च करून श्रीधर नाईक उद्यान कसे बांधणार? याचेही उत्तरही त्यांनी शोधावे असे ते म्हणाले.कणकवली उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष दालनात शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी नगरसेवक संजय कामतेकर, बांधकाम सभापती मेघा गांगण, अभिजित मुसळे, अॅड.विराज भोसले, महेश सावंत आदी उपस्थित होते.यावेळी बंडू हर्णे म्हणाले, राजकीय क्षेत्रात कोणतेही स्थान नसलेले संदेश पारकर हे भूलथापा मारून प्रसिद्धीचा हव्यास पूर्ण करून घेत आहेत. तसेच अर्धवट माहितीच्या आधारे कोट्यवधी निधीच्या घोषणा करत आहेत.कणकवली शहरातील क्रीडांगणाच्या विकासासाठी कणकवली नगरपंचायतीने २८ कोटींचा निधी मागितला होता. तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ४ कोटी निधी देण्याची ग्वाही दिली होती. मात्र गेल्या वर्षभरात क्रीडांगणाच्या विकासासाठी एक रुपयाचाही निधी आलेला नाही. तसा निधी आला असल्यास कुठल्या योजनेतून निधी आला आणि त्याला मिळालेली प्रशासकीय मान्यता संदेश पारकर यांनी दाखवावी. जर प्रशासकीय मान्यता पारकर दाखवू शकले नाहीत तर त्यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी आणि निधी आला असेल तर आम्ही राजकारण सोडून देवू.शहरातील श्रीधर नाईक उद्यानासाठीही १ कोटींचा निधी आणल्याच्या बाता पारकर मारत आहेत. हे उद्यान महामार्ग चौपदरीकरणात बाधित झाले आहे. मात्र या उद्यानाच्या मागील बाजूस ९ गुंठे आरक्षणातील जागा शिल्लक आहे. मात्र ही जागा खासगी मालकांच्या ताब्यात आहे. ती अद्यापही नगरपंचायतीकडे वर्ग झालेली नाही. अथवा या जागेची भूसंपादन प्रक्रियाही झालेली नाही. जर जागाच ताब्यात नसेल तर तेथे उद्यान कसे बांधणार याचेही उत्तर पारकरांनी शोधायला हवे.संदेश पारकर यांनी सर्वच बाबतीत राजकारण केले. मात्र त्यांनी आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत राजकारण करू नये. एक कोटी रुपयांत भव्य स्मारक होऊच शकत नाही. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे. तसेच पारकर सांगत असलेली जागा जिल्हा परिषदेने आधीच गावठी आठवडा बाजारासाठी दिलेली आहे. त्यामुळे छत्रपतींच्या स्मारकाबाबत पारकर यांनी चुकीची माहिती देऊ नये असेही हर्णे म्हणाले.पारकर हे कणकवलीचे नगराध्यक्ष होते. त्यांना भूसंपादन प्रक्रिया, प्रशासकीय मान्यता, नगरपंचायतीचे ठराव आदींबाबतची माहिती असायला हवी होती. पण कोणतीही माहिती न घेता ते कोट्यवधीची उड्डाणे करत आहेत . हे योग्य नव्हे. असेही बंडू हर्णे यावेळी म्हणाले.