सावंतवाडी : व्यक्तीगत कामासाठी पुंडलिक दळवी हे मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात येतात म्हणून सांगणाऱ्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या अनारोजीन लोबो यांनी एक तरी माझे व्यक्तिगत काम दाखवून द्यावे, अन्यथा त्यांनी जाहीर माफी मागावी. जर आरोप सिद्ध झाल्यास मी राजकीय संन्यास घेईन असे जाहीर आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी लोबो यांना दिले.ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर, ॲड. सायली दुभाषी, हिदायतुल्ला खान, काशिनाथ दुभाषी, राकेश नेवगी, दर्शना बाबर-देसाई ईफ्तिकार राजगुरू, बावतीस फर्नांडिस, याकूब शेख, पूजा दळवी उपस्थित होते.दळवी म्हणाले, अर्चना घारे मतदार संघात फिरल्या हे दीपक केसरकरांच्या जिव्हारी लागले. आता भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली सुद्धा आमदारकीसाठी तुमच्या मतदारसंघात फिरत आहेत. त्यामुळे ही नाराजी मुख्यमंत्र्यांकडे मांडणार, की पुन्हा पक्ष सोडून जाणार? असा सवाल करत केसरकारांनी यापूर्वी दहशतवादाच्या मुद्द्यावरून राजकीय पोळी भाजून घेतली. मात्र आज ज्यांच्यावर दहशतवादाचे आरोप केले त्यांच्याच ओसरीला जाऊन बसल्यामुळे त्यांच्याकडे टीका करण्यासारखे काहीच उरले नाही. त्यामुळे ते राष्ट्रवादीवर आणि आमच्या नेत्यांवर टीका करत आहेत.केसरकर यांनी मतदारसंघात केलेला विकास हा राष्ट्रवादीच्या माध्यमातून केला आहे. नंतरच्या काळात त्यांनी किती विकास केला हे जनतेने सुद्धा पाहिले आहे. अर्चना घारेंनी मतदार संघात लावलेला सामाजिक कार्याचा धडाका पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली असल्याचे दळवी म्हणाले.मी माझ्या कामांसाठी केसरकारांकडे जातो, अशी टीका लोबो यांनी केली. मात्र मी त्यांच्याकडे एक व्यापारी संघाचा नेता या नात्याने व्यापाऱ्यांच्या समस्या घेऊन गेलो असेन. केसरकर यांनी माझे एक जरी वैयक्तिक काम केले असेल तर जाहीर करावे त्याच दिवशी मी राजकीय संन्यास घेईन, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.पद सोडा साधी सायकल तरी दिली का? राष्ट्रवादी काँग्रेसने तुम्हाला महिला जिल्हाध्यक्ष पद दिले, तसेच तुमचा सन्मान केला आणि फिरण्यासाठी गाडी सुद्धा दिली. मात्र नंतरच्या काळात ज्यांच्या सोबत गेलात त्या ठिकाणी पद सोडा साधी सायकल तरी दिली का ? असा सवाल राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर यांनी अनारोजीन लोबो यांना केला.
व्यक्तिगत काम दाखवून द्या राजकीय संन्यास घेतो, पुंडलिक दळवीचे अनारोजीन लोबोंना खुलं आव्हान
By अनंत खं.जाधव | Published: March 14, 2023 6:11 PM