लोकमत न्यूज नेटवर्कमालवण : महाराष्ट्र किनारपट्टीवरील मच्छिमारांच्या समस्या जाणण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘शिवार संवाद’ सभेत बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना मच्छिमारांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पर्ससीन नौकांवरून सर्व्हे करून मत्स्योद्योगमंत्री महादेव जानकर यांनी पारंपरिक मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. मुख्यमंत्र्यांचा पर्ससीनविरोधी आदेश पायदळी तुडविला आहे. मत्स्योद्योगमंत्री पुन्हा सिंधुदुर्गात आल्यास त्यांना पारंपरिक मच्छिमार जागा दाखवून देतील, अशी संतप्त भावना महिला मच्छिमार आकांक्षा कांदळगावकर यांनी व्यक्त करताच मच्छिमारांनीही जानकरांकडून मत्स्य खाते काढून घेण्याची मागणी करणाऱ्या घोषणा दिल्या. भाजपच्यावतीने पंडित दीनदयाळ जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘शिवार संवाद’ यात्रेचा प्रारंभ बंदर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर अतुल काळसेकर, राजन तेली, संदेश पारकर, काका कुडाळकर, अतुल रावराणे, सुदेश आचरेकर, राजन वराडकर, विलास हडकर, बाबा मोंडकर, रविकिरण तोरसकर, आप्पा लुडबे, गणेश कुशे, पूजा करलकर, पूजा सरकारे, भाऊ सामंत, प्रभाकर सावंत, बबलू राऊत, महेश मांजरेकर, गोपीनाथ तांडेल, गंगाराम आडकर, रमेश धुरी, स्नेहा कुबल, ज्योती तोरसकर, आदी भाजप पदाधिकारी व मच्छिमार नेते उपस्थित होते. यावेळी मंत्री चव्हाण यांच्या हस्ते ‘नीलक्रांती’ या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन व चित्रकला प्रदर्शनाचा प्रारंभ करण्यात करण्यात आला. शिवार संवाद यात्रेला जिल्ह्यातील मच्छिमार बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.सहदेव खडपकर यांनी माशाला पिल्लं घालण्याची संधी द्या. मत्स्य प्रजातींना आरक्षण दिल्यास मच्छिमारांचे प्रश्न सुटू शकतील, असे सांगितले, तर गोपीनाथ तांडेल यांनी सर्जेकोट बंदरात मच्छिमारी व पर्यटन व्यवसाय केले जात असून, एकच जेटी असल्याने नवीन जेटी बांधून मिळावी अशी मागणी करताना एनसीडीसीअंतर्गत मच्छिमारांनी घेतलेल्या कर्जावर कर्जमाफी नको; मात्र व्याजमाफी मिळालीच पाहिजे, अशी भूमिका घेतली. मच्छिमारांच्या मासळीला अपेक्षित भाव मिळण्यासाठी शासनाने शासकीय घाऊक मासळी बाजाराची स्थापना करावी. जिल्हा परिषदेमधून शेतकऱ्यांप्रमाणे मच्छिमारांना मासेमारीसाठी आवश्यक अवजारे पुरविण्यात यावीत, अशी मागणी मेघनाद धुरी यांनी केली. यावेळी रमेश धुरी, महेंद्र पराडकर, गोविंद केळुसकर यांनी मच्छिमारांच्या समस्या मांडल्या. अतुल काळसेकर म्हणाले, जिल्ह्यातील मच्छिमार समाजातील तरुण मासेमारीसोबत पर्यटनपूरक व्यवसायाकडे वळला आहे. किल्ले सिंधुदुर्ग जसे जिल्हावासीयांचे भूषण आहे तसे कवडा रॉक विकसित केल्यास बेरोजगारी नष्ट होऊ शकेल. त्यामुळे येथे पर्यटन जेटी उभारण्यात यावी. यावेळी मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष विकी तोरसकर यांचे कौतुक करण्यात आले. जानकरांबद्दल मौन‘शिवार संवाद’ सभेत मच्छिमार बांधवांनी मांडलेल्या समस्यांमागे भावना दडलेल्या आहेत. त्यामुळे, मच्छिमारांनी सुचित केल्यानुसार अंमलबजावणी करणे हे शासन म्हणून माझे कर्तव्य राहील, असे सांगितले. चव्हाण यांनी जानकर यांच्याबद्दल न बोलणेच पसंत केले. सरकारला नमवू नका, असे आवाहन करताना सर्व समाजघटकांना न्याय देण्यासाठी प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून प्रयत्नशील असल्याचेही रवींद्र चव्हाण म्हणाले.
मत्स्योद्योगमंत्र्यांना जागा दाखवून देऊ!
By admin | Published: May 25, 2017 11:08 PM