कणकवली : कणकवली तालुक्यातील तोंडवली येथील ठकसेन श्रीकृष्ण शामसुंदर कुडतरकरचा आणखी एक प्रताप उघड झाला आहे. नोकरीच्या आमिषाने त्याने आणखी एकाला लाखोंचा चुना लावला आहे. सिद्धेश खंडू सावंत ( रा.फळसेवाडी, वरवडे ) असे त्या युवकाचे नाव असून त्याच्याकडून १ लाख ७९ हजार ५०० रुपये कुडतरकर याने उकळले आहेत.श्रीकृष्ण कुडतरकर याने आपण सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये नोकरीला असून रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिकपदी नोकरीला लावण्याचे आमिष सिद्धेश सावंत याला दाखविले. त्यामुळे सिद्धेश याने २९ डिसेबर रोजी रोख २८ हजार ५०० रुपये कुडतरकरच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यात जमा केले. त्यानंतर सिद्धेश याची बहीण वृषाली पडते हिने भाऊ सिद्धेशच्या नोकरीसाठी कुडतरकरच्या खात्यात काही रुपये जमा केले.बँकेच्या ऑनलाईन ऍप मधून ५ जानेवारी २०१९ रोजी ६ हजार, ७ जानेवारी रोजी ३५ हजार, ८ जानेवारी रोजी ९५ हजार तर १५ फेब्रुवारी रोजी १५ हजार रुपये श्रीकृष्ण कुडतरकरच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. मात्र , पैसे देऊनही नोकरी न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे सिद्धेश याच्या लक्षात आले.
त्यामुळे त्याने सोमवारी कणकवली पोलीस ठाण्यात श्रीकृष्ण कुडतरकर विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून अधिक तपास करण्यात येत आहे.दरम्यान, नोकरीच्या आमिषाने श्रीकृष्ण कुडतरकर याने अनेकांना लाखोंचा चुना लावल्याचे समोर येत आहे. त्याने आतापर्यंत चौघांची फसवणूक केल्याचे उजेडात आले असून अजूनही काही जणांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीनेही पोलीस तपास करीत आहेत.