बांदा : शहरातील बसस्थानकानजीक गजबजलेल्या परिसरातील जयेश राजेंद्रप्रसाद वाळके यांचे बंद घर अज्ञात चोरट्याने फोडून चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. गेले कित्येक दिवस हे घर बंद असल्याने चोरट्याच्या हाती काहीही लागले नाही. मात्र भरवस्तीत असलेले हे घर फोडल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रणाली वाळके यांनी याबाबत बांदा पोलिसांत अर्ज देऊन या चोरीचा तपास करण्याची मागणी केली आहे.चोरीच्या पद्धतीवरून चोरटा हा माहीतगार असण्याची शक्यता बांदा पोलिसांनी व्यक्त केली आहे. जयेश वाळके हे आपल्या कुटुंबीयांसह नोकरीनिमित्त पणजी (गोवा) येथे राहतात. त्यांचे हे घर गेले काही दिवस बंद आहे. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने रात्री घराच्या छपराची कौले काढून हॉलमध्ये प्रवेश केला. हॉल व बेडरूममधील सामान विस्कटलेल्या स्थितीत होते. मात्र चोरट्याने घरातील किमती सामानाला हात न लावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.तसेच चोरट्याने आपली पँट तिथेच बेडरूममध्ये ठेवली होती. तेथे असलेली जीन्स पँट त्याने परिधान करून पलायन केले. घरातील किमती सामानाला हात न लावता चोरट्याने बाथरूममधील खिडकीच्या काचा काढून पोबारा केला. घरातील किमती सामान चोरीस न गेल्याने वाळके यांनी पोलीस स्थानकात चोरीची तक्रार दिली नाही. मात्र चोरीचा तपास करावा यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांना निवेदन दिले आहे.शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास छपराची कौले काढून घरात चोरी झाल्याची कल्पना वाळके यांना लगतच असलेल्या केळी बागायतदार कालिदास दळवी यांनी दिली होती. त्यानुसार त्यांनी बांदा येथे येत घराची पाहणी केली. घराची कौले दोन ठिकाणी काढल्याचे यावेळी निदर्शनास आले.चोरीबाबत आश्चर्यबांदा शहरातील बसस्थानक परिसरात वाळके यांचे घर असून हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. वाळके यांच्या घरालगतच कालिदास दळवी हे केळी बागायत करीत असल्याने त्यांचा दररोज याठिकाणी वावर असतो. त्यामुळे चोरीचा प्रयत्न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. बांदा शहरातील बससस्थानक परिसरातील जयेश वाळके यांच्या घराची कौेले काढून चोरट्याने चोरीचा प्रयत्न केला. तर दुस-या छायाचित्रात खिडकीच्या काचा फोडून चोरट्याने पोबारा केला.
शहरातील बंद घर फोडले, भर वस्तीतील प्रकाराने उडाली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2018 1:36 PM