दोडामार्ग : हेवाळे बांबर्डे परिसरात दिवसाढवळ्या वन्य हत्ती मुक्तपणे संचार करू लागले असून येथील अननस व उरली सुरली शेती बागायतीवर यथेच्छ ताव मारत आहेत. एका कळपात मादीसह दोन पिल्लू तर दुसऱ्या कळपात नर व मादी आहे. त्यामुळे त्यांना हाकलविण्यासाठी शेतकऱ्यांंची तसेच वन विभागाचीही हिंमत होत नाही.
वनविभागाचे कर्मचारी आपली सेवा बजाविण्यात कसूर करत असल्याची तक्रार वरिष्ठ पातळीवर करणार असल्याची माहिती युवा कार्यकर्ते सिध्देश राणे यांनी दिली. शेतीवर विसंबून असलेल्या शेतकºयांना तत्काळ नुकसान भरपाई देण्यात आली नसल्यास शेतकरी आक्रोश छेडण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला .
वन्य हत्ती उपद्रवाचा जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रश्न कोनाळ वनकार्य क्षेत्रात असूनही येथील वनपाल यांचा प्रभारी कारभार वनरक्षक यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. अनुभवी वनरक्षक आवश्यक असताना नवखे कर्मचारी नेमून लोकांच्या जीविताशी आणि शेतकºयांच्या उदरनिर्वाहाशी वनखाते खेळ करत आहेत. तसेच नेमण्यात आलेले कर्मचारी कामचुकार व ड्युटीबाबत हयगय करीत असल्याचा आरोप ग्रामस्थातून होत आहे.
शिवाय जी नवखी मंडळी वनरक्षक म्हणून हेवाळे व बांबर्डे बीटमध्ये नियुक्त करण्यात आली आहेत. त्यांचीही येथून तत्काळ बदली करून अनुभवी व हत्ती ओळख असलेलेच कर्मचारी याठिकाणी नियुक्त केले पाहिजेत. वनखात्याने वन्यहत्तींना लोकवस्ती व शेतातून नैसर्गिक अधिवासात पुन्हा पाठविण्यासाठी ५ जणांचे दैनंदिन गस्तीपथक सुद्धा हेवाळे, घाटीवडे, बांबर्डे व बाबरवाडी गावासाठी तैनात केले आहे. मात्र सायंकाळी ७ ची ड्युटी असूनही हे पथक रात्री १० पर्यंत गावात फिरकत नाही. शिवाय ५ जणांची कागदोपत्री टीम आणि ड्युटीवर अवघे २-३ जण अशी अतिशय बेजबाबदार आणि शासकीय कर्मचा-यांच्या कर्तव्याला हरताळ फासणारी ड्युटी संबंधित कर्मचारी बजावत आहेत.
मात्र कर्तव्यात वारंवार कसूर करणाºया व लोकांच्या जीविताशी आणि उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या शेतीच्या नुकसानिशी गंभीर नसलेल्या कर्मचा-यांना तत्काळ येथून कार्यमुक्त करावे. व अनुभवी कर्मचा-यांना नियुक्त करावे. तसेच शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याची तजवीज शासनाने करावी. अन्यथा शेतकरी आक्रोश छेडण्यात येणार असल्याचा ईशारा युवा कार्यकर्ते सिध्देश राणे यांनी दिला आहे .
रविवारी रात्री मोर्लेत हत्ती दाखलहेवाळे परिसरात धुमाकूळ घालून हत्तींनी आपला मोर्चा रविवारी रात्री मोर्ले गावात वळविला. काही शेतक-यांची शेती उद्ध्वस्त केली. रात्रीच्या वेळी अचानक मोर्ले गावात रानटी हत्तीने शिरकाव केल्याने ग्रामस्थ बिथरले. हत्ती थेट वस्तीत शिरकाव करू लागल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .