सावंतवाडी : आमदारांच्या वेतन व निवृत्तिवेतनवाढीबद्दल सावंतवाडीत स्वाक्षरी अभियानाद्वारे नाराजी व असंतोष व्यक्त करण्यात आला. शेकडो नागरिकांनी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही या स्वाक्षरी मोहिमेतून आमदारांच्या वेतनवाढीबाबत आपली नाराजी व्यक्त केली. सह्यांचे हे निवेदन राज्यपालांना पाठविण्यात आले.राज्यातील आमदारांच्या वेतनात तसेच निवृत्तिवेतनात भरघोस वाढ करण्यात आली आहे. या वेतनवाढीबाबत राज्यात ठिकठिकाणी नाराजी व्यक्त केली जात आहे. रविवारी सावंतवाडीतही स्वाक्षरी अभियानाद्वारे याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. येथील श्रीराम वाचन मंदिरासमोरील मोती तलावाच्या कट्ट्यावर सुजाण नागरिक दलातर्फे हे स्वाक्षरी अभियान आयोजित करण्यात आले होते. त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.सध्या राज्यासमोर कर्जाचा बोजा, शेतकरी, शिक्षक, सामान्य नागरिकांसमोरील आर्थिक संकटे, दुष्काळ, पूर, अतिवृष्टीने निर्माण झालेली भयावह परिस्थिती आहे. ती लक्षात घेता अशाप्रकारे स्वत:चे वेतनवाढ मंजूर करून घेणे योग्य व आवश्यक नाही, अशी भूमिका स्पष्ट करून नागरिकांनी या वेतनवाढीबाबत आपली नाराजी व्यक्त केली. शहरातील ज्येष्ठांपासून सामान्य नागरिक, व्यापारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, हमाल, कामगार यांनीही आमदारांच्या वेतन व निवृत्तिवेतन वाढीबद्दल स्वाक्षरी अभियानाद्वारे नाराजी व असंतोष व्यक्त केला. रविवारी सकाळपासून सुरू झालेले हे अभियान दिवसभर सुरू होते. यात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला. स्वाक्षरींचे हे निवेदन महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांना पाठविण्यात आले.यावेळी सुजाण नागरिक दलाचे प्रसाद पावसकर, डॉ. मधुकर घारपुरे, जयप्रकाश वाळके, सत्यजित धारणकर, सुहास सातोसकर, एस. एस. देसाई, सुरेश मुननकर, शेखर येडये, डॉ. आर. व्ही. कामत, पल्लवी कामत, गणेश कुडव, प्रज्ञा शेर्लेकर, इस्माइल शेख, साईप्रसाद हवालदार, पूजा शेर्लेकर, ए. एस. बांदेकर यांच्यासह असंख्य नागरिकांनी या स्वाक्षरी अभियानात सहभाग घेतला. (वार्ताहर)
आमदार वेतनवाढीविरोधात स्वाक्षरी मोहीम
By admin | Published: August 16, 2016 9:49 PM