आरोंदा : सिलिका मायनिंग प्रकल्प आरोंदा येथे व्हावा की होऊ नये, यावरून वातावरण तापले असतानाच आरोंदा मासिक सभेत उपसरपंच अशोक नाईक यांच्यासह नऊ सदस्यांनी सिलिका मायनिंग प्रकल्पाला ना हरकत दाखला देण्यास सहमती दर्शवल्याने सरपंच उमा बुडे आजच्या ग्रामसभेत एकाकी पडल्या आहेत. त्यामुळे सिलिका मायनिंग प्रकल्पावरून आरोंदा ग्रामपंचायतमध्ये उभी फूट पडली असून, ९ विरूध्द २ अशा ठरावाने या प्रकल्पाला ना हरकत दाखला देण्यात आला आहे.आरोंदा खरी येथे सिलिका मायनिंगचा प्रकल्प येत आहे. त्यासाठी कंपनीला आरोंदा ग्रामपंचायतचा ना हरकत दाखला अपेक्षित होता. यासाठी कंपनीने ग्रामपंचायतकडे प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावावर अनेकवेळा चर्चा झाली; पण प्रकल्प प्रदूषणकारी असेल, या भीतीने प्रकल्पाला विरोध होत होता. मात्र, काही सदस्यांनी यातून मार्ग काढत हा प्रकल्प गावाच्या बाहेर चार किलोमीटर होत असून, त्यापासून गावाला कोणताही धोका नसल्याचे सदस्यांच्या लक्षात येताच त्यांनी या प्रकल्पाला विरोध न करण्याचे ठरवले होते. मात्र, सरपंच उमा बुडे यांचा विरोध कायम होता.यासाठी सोमवारी आरोंदा ग्रामपंचायतची विशेष मासिक सभा सरपंच उमा बुडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी सिलिका मायनिंग प्रकल्पाला ना हरकत दाखला देण्याबाबत मासिक सभेत चर्चा झाली. या चर्चेवेळी सरपंच उमा बुडे यांनी सिलिका मायनिंग प्रकल्प प्रदूषणकारी प्रकल्प असल्याने त्याला ना हरकत दाखला नको, अशी भूमिका घेतली. त्याला सदस्य विष्णू नाईक यांनी पाठिंबा दिला. मात्र, उपसरपंच अशोक नाईक यांनी हा प्रकल्प गावापासून चार किलोमीटर बाहेर आहे. त्यापासून प्रदूषण होणार नाही, अशी भूमिका मांडली. त्यांच्या भूमिकेला सदस्य आत्माराम आचरेकर, अनंत सातोस्कर, सहदेव साळगावकर, भाग्यश्री तारी, भाग्यश्री रेडकर, शुभांगी नाईक, माधुरी नाईक आदींनी पाठिंबा दर्शवला. त्यामुळे मासिक सभेत आरोंदा ग्रामपंचायतमध्ये उभी फूट पडल्याचे दिसून आले आहे.सिलिका मायनिंग प्रकल्पाबाबत आरोंदा ग्रामपंचायतने घेतलेल्या भूमिकेत सरपंच उमा बुडे व सदस्य विष्णू नाईक हे दोन सदस्य एकीकडे, तर अन्य नऊ सदस्य दुसरीकडे असल्याचे दिसून आले आहेत. (प्रतिनिधी)
सिलिका प्रकल्पावरून आरोंदा ग्रामपंचायतीत फूट
By admin | Published: February 29, 2016 10:44 PM